टकला सापडला; दाऊदचे काय? (भाग- १ )

दाऊदचा निकटवर्ती मानला जाणारा फारुख टकला अखेर भारताच्या ताब्यात आला आहे. यामुळे मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील महत्त्वाचा दुवा सापडल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले किंवा कसे, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, विविध देशांशी भारताने केलेल्या प्रत्यार्पण करारांच्या माध्यमातून 2002 पासून असंख्य आरोपी भारताच्या ताब्यात आले आहेत. आता दाऊद इब्राहिम, टायगर मेमन तसेच मोठे आर्थिक घोटाळे करून फरार झालेले आरोपी कधी ताब्यात मिळतात याकडे लक्ष लागले आहे.

पंचवीस वर्षांपूर्वी झालेल्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांचा प्रमुख सूत्रधार, कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा साथीदार फारुख टकला याला सीबीआयने अटक केली आहे. स्फोटांच्या पूर्वी आणि नंतर या प्रकरणातील जे प्रमुख आरोपी देशाबाहेर पळून गेले होते, त्यांना मदत केल्याचा आरोप टकला याच्यावर आहे. बॉम्ब बनविण्याच्या तसेच अत्याधुनिक शस्त्रास्त्रे चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी आरोपींना विनाचौकशी दुबईहून कराचीला पाठविण्याचे कामही त्याने केले होते, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दुबईहून दिल्ली विमानतळावर उतरताच फारुख टकला याला अटक करण्यात आली. आखाती देशांत नव्वदीच्या दशकापासून तो हवालाचा व्यवसाय करीत असे. त्याने दाऊदप्रमाणे पाकिस्तानात आश्रय घेतला नव्हता. अरुण गवळी टोळीबरोबर शत्रुत्व निर्माण झाल्यानंतर टकला मुंबई सोडून गेला. गवळी टोळीतील शैलेश हळदणकर सप्टेंबर 1992 मध्ये रुग्णालयात भरती झालेला असताना दाऊद टोळीने त्याची हत्या केली होती. दाऊदचा मेहुणा इब्राहिम पारकर याच्या हत्येचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आली, असे सांगण्यात येते. पारकर याला गवळी टोळीच्या दोनजणांनी 1992 मध्येच मारले होते.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांतील सर्व आरोपींच्या राहण्याची तसेच परदेशांत त्यांना व्यापार सुरू करण्याची सोय टकलाने केली होती. दाऊद आणि त्याचे कुटुंबीय, तसेच बॉम्बस्फोट प्रकरणातील अन्य महत्त्वाचा आरोपी टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबीयांनी नंतर दुबई सोडली आणि पाकिस्तानात आश्रय घेतला. टकला मात्र आखाती देशांमध्येच राहिला. हवाला व्यवसाय वाढवला. त्याचा व्यवसाय मुख्यत्वे दुबईहूनच चालत असे. याखेरीज आखातातील आणखी काही देशांमधून बनावट नावाने तो हा व्यवसाय करीत असे.

टकलाविरुद्ध सीबीआयने इंटरपोलच्या माध्यमातून 1995 मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. मोहंमद फारुख हे त्याचे मूळ नाव. त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस प्रलंबित असल्यामुळे तो दिल्लीत नेमका कसा आला? त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले का? या प्रश्‍नांची उत्तरे देण्यास सीबीआयने नकार दिला आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या साह्याने संयुक्त अरब अमिरातीमधून त्याला दिल्लीच्या विमानात बसविण्यात आले, असे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत पश्‍चिम आशियात भारताचे वर्चस्व वाढले असून, त्याचा परिणाम म्हणून भारताला हव्या असलेल्या काही संशयितांना भारतात पाठविण्यात येत आहे, असेही सांगितले जाते. मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते, टकलाच्या अटकेमुळे या प्रकरणातील मोठा दुवा हाती सापडला आहे. स्फोटांच्या कटाविषयी ज्यांना आधीपासून माहिती होती, अशा व्यक्तींपैकी टकला एक आहे.

बॉम्बस्फोट होण्याच्या अनेक दिवस आधी दाऊद आणि टायगर मेमनला भारतातून दुबईला पाठविण्यात आले होते. बॉम्बस्फोट घडविणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षण देणे हा त्यामागील हेतू होता. बॉम्बस्फोटांच्या तपासात सहभागी असलेले सहायक पोलीस आयुक्त सुरेश वली शेट्टी यांनी दावा केला आहे की, आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या मदतीने टकला बॉम्बस्फोटातील आरोपींना विनातपासणी दुबईहून कराचीला पाठवीत असे. त्यांना प्रशिक्षण केंद्रापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही त्याच्यावरच होती. आयएसआयकडून या व्यक्तींना बॉम्ब पेरणे तसेच आरडीएक्‍स या स्फोटकाविषयी आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांविषयी प्रशिक्षण मिळाले.

प्रसाद पाटील 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)