पालकमंत्री प्रा. शिंदे : टॅंकरचा प्रस्ताव आल्यास तत्काळ कार्यवाही करा
नगर – जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार प्रस्तावित कामे तत्काळ मार्गी लावण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केल्या. टॅंकरचे प्रस्ताव आल्यास ते तपासून तत्काळ कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात काल टंचाई आढावा व नियोजन बैठक पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खा. दिलीप गांधी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आ. विजयराव औटी, आ. बाळासाहेब मुरकुटे, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, उपमहावनसंरक्षक आदर्श रेड्डी, विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगोले, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जि. प. उपाध्यक्षा राजश्री घुले आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री शिंदे म्हणाले, सध्या पारनेर, संगमनेर तसेच काही प्रमाणात शेवगाव, पाथर्डी भागात पाणीटंचाईच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणच्या नळपाणीपुरवठा योजना बंद असल्याने, नादुरुस्त असल्यानेही त्या-त्या गावांत पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. टंचाई परिस्थितीत हाती घ्यावयाच्या विविध उपाययोजनांची कामे तत्काळ मार्गी लागली तरच ऐन मे महिन्यात नागरिकांना त्या योजनांमुळे पाणी मिळू शकेल. त्यामुळे ही कामे पूर्ण करण्यासाठीची कार्यवाही संबंधित यंत्रणेने करावी, असे शिंदे यांनी सांगितले. या बैठकीस विविध पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती-उपसभापती, विविध विभागांचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.
मुळा, निळवंडे प्रकल्पात 44 टक्के पाणीसाठा
जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा आणि निळवंडे या मोठ्या प्रकल्पात सरासरी 44.53 टक्के पाणीसाठा आहे. त्याचप्रमाणे मध्यम प्रकल्पात सरासरी 43.24 टक्के पाणीसाठा आहे. कुकडी प्रकल्पांतर्गत विविध प्रकल्पात एकूण सरासरी 27.22 टक्के पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील संगमनेर आणि पारनेर तालुक्यात 17 टॅंकर सुरु कऱण्यास परवानगी देण्यात आली आहे. टंचाई आराखड्यांतर्गत बुडक्या खोदणे, विहिरी खोल करणे, विहीर अधीग्रहण, टॅंकर, प्रगतीपथावरील नळपाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती आणि तात्पुरत्या नळ योजना आदी उपाययोजनांचा समावेश आहे. त्यापैकी सुचविण्यात आलेल्या उपाययोजना तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी दिले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा