टंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबाजवणी गरजेची

– सागर येवले

पुणे – परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईचे भीषण संकट उभे राहणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी जानेवारीत सुरू होणारे टंचाई आराखड्याचे काम ऑक्‍टोबरमध्येच सुरू करण्यात आले. यावर्षी 65 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरीही देण्यात आली. मात्र, ज्या तत्परतेने आणि वेळेआधीच आराखडा तयार करण्यात आला, अगदी तशीच त्याची अंमलबजावणी आवश्‍यक आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करणे आवश्‍यक आहे.

जिल्ह्यात 23 टॅंकरच्या मदतीने 68 गाव आणि 349 वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामध्ये सर्वाधिक टॅंकर बारामती तालुक्‍यात सुरू असून पुरंदर, जुन्नर, दौंड, शिरूर तालुक्‍यातही टॅंकर सुरू आहेत. हिवाळ्यामध्येच टॅंकरची वाढती संख्या आणि गावांमधून येणारे प्रस्ताव पाहता मार्च आणि एप्रिलनंतर टॅंकरची संख्या शंभरी गाठेल हे नक्की. त्यामुळे टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी टंचाई भासणारी संभाव्य गावे आणि वाडी-वस्तीवरील पाणी टंचाई निवारण्यासाठी यंदाच्या “टंचाई कृती आराखड्यात’ विविध कामे घेण्यात आली आहेत. त्यामध्ये नवीन विंधन विहिरी घेणे, नळ योजनांची आणि विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती, नळ- पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करणे, विहिरींचे अधिग्रहण, विहीर खोल किंवा गाळ काढणे इत्यादी कामांचा समावेश आहे.

त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून गरजेनुसार अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेस टंचाईचे प्रस्ताव 10 डिसेंबरपर्यंत पाठवावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्यानुसार सर्व प्रस्ताव एकदम न पाठवता जसजसे प्रस्ताव तयार होतील तसतसे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे ते त्वरीत मंजूर होवून कामांना गती मिळेल. तसेच अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आवश्‍यकतेनुसार बदल शक्‍य होईल, असे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले. परंतू, हे करत असताना जिल्ह्यातील नागरिकांची तहान वेळेत भागवली, पाण्याचे योग्य नियोजन झाले आणि सर्वांना पाणी उपलब्ध झाले तरच जिल्हा परिषदेच्या कष्टाचे चिज झाले, असे म्हणता येईल. त्यासाठी टंचाई आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी आणि गाव, वाडी वस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)