झोपेचे सोंग घेतलेले सरकार ! (अग्रलेख)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढत आहेत म्हणून इंधनदरवाढ होते आहे हे मोदी सरकारकडून दिले जाणारे कारण पटणारे नाही. भाजपचे प्रवक्ते याबाबत प्रेस कॉन्फरन्स घेऊन धादांत दिशाभूल करणारी विधाने करीत आहेत हे आणखी संतापजनक आहे. महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्‍त्याने तर मनमोहन सिंग यांच्या काळात ज्या दराने पेट्रोल दिले जात होते त्याच दरात आम्ही सध्या पेट्रोल देत आहोत असे धडधडीत खोटे विधान पत्रकारांशी बोलताना केल्याचे वाहिन्यांवर पाहायला मिळाले आहे. भाजपचे नेते कितीही दिशाभूल करीत असले तरी लोकांना प्रत्यक्ष बाजारात जे भोगावे लागत आहे त्यामुळे त्यांचा या वायफळ बडबडीवर विश्‍वास बसण्याची सूतराम शक्‍यता नाही. 
इंधन दरवाढ, महागाई आणि राफेल कराराच्या विरोधात कॉंग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला सर्वत्र बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. मोदी सरकारच्या विरोधात वातावरण तापवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या या बंद मागे जनतेत या सरकारविषयी प्रचंड रोष असल्याचे चित्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाल्याचे विविध ठिकाणच्या बातम्यांवरून लक्षात येते. एकीकडे हा बंद सुरू असताना दुसरीकडे इंधनातील दरवाढ सुरूच होती. रुपयाची किंमत आज पुन्हा घसरली आणि पुन्हा एक नीचांकाचा विक्रम नोंदवला गेला.
रोज घसरणाऱ्या रुपयाच्या किमतीमुळे आणि येथून पुढे रोजच एक नवीन नीचांक नोंदवला जाणार आहे. ही स्थिती अभूतपूर्वच आहे. या पार्श्‍वभूमीवर मोदींच्या सन 2013-14 सालातील भाषणांचे व्हिडीओ सगळीकडे फिरू लागले आहेत. वास्तविक स्थितीत बदल व्हावा म्हणून लोकांनी मोदींना दिलखुलास प्रतिसाद दिला पण मोदींनाही ही परिस्थिती बदलता आली नाही हे जनतेचे दुर्दैव आहे. वास्तविक इंधनाचे दर आवाक्‍यात आणणे आजही अवघड नाही, कारण आजही आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरल केवळ 78 डॉलर्स च्या आसपास आहेत. मनमोहन सिंग सरकारच्या काळापेक्षाही ही स्थिती अजूनही अनुकूल आहे, पण या सरकारला आर्थिक व्यवस्थापन जमलेले नाही. तब्बल 12 वेळा उत्त्पादन शुल्कात वाढ करून मोदी सरकारने जनतेची तब्बल 11 लाख कोटी रुपयांची लूट एकट्या इंधन दरात केली आहे, हे लोकांच्या नजरेतून सुटलेले नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढत आहेत म्हणून इंधन दरवाढ होते आहे हे मोदी सरकारकडून दिले जाणारे कारण पटणारे नाही. भाजपचे प्रवक्‍ते याबाबत प्रेस कॉन्फरन्स घेऊन धादांत दिशाभूल करणारी विधाने करीत आहेत हे आणखी संतापजनक आहे. महाराष्ट्र भाजपच्या प्रवक्‍त्याने तर मनमोहन सिंग यांच्या काळात ज्या दराने पेट्रोल दिले जात होते त्याच दरात आम्ही सध्या पेट्रोल देत आहोत असे धडधडीत खोटे विधान पत्रकारांशी बोलताना केल्याचे वाहिन्यांवर पाहायला मिळाले आहे. भाजपचे नेते कितीही दिशाभूल करीत असले तरी लोकांना प्रत्यक्ष बाजारात जे भोगावे लागत आहे त्यामुळे त्यांचा या वायफळ बडबडीवर विश्‍वास बसण्याची सूतराम शक्‍यता नाही. लोकांच्या या भावनांना वाट करून देण्यासाठी कॉंग्रेसने भारत बंदचे आयोजन केले होते. त्यांनी त्यांच्या परीने बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. पण समस्त विरोधकांना याबाबतीत एकत्र आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मात्र पुरेशी साथ मिळालेली दिसली नाही.
मोदी सरकारच्या विरोधात अत्यंत कडवडवट भूमिका घेणारा तृणमूल कॉंग्रेस पक्ष या बंदपासून दूरच राहिला. ओडिशातील बिजू जनता दल तटस्थ राहिला आणि आम आदमी पक्षही बंदपासून दूरच राहिला. दोन्ही कम्युनिस्ट पक्ष बंदमध्ये सहभागी झाले होते, पण त्यांचा बंद स्वतंत्र होता. मोदी विरोधकांमध्ये जनतेच्या प्रश्‍नावर सुद्धा एकवाक्‍यता नाही असा संदेश यातून गेला आहे. शिवसेनेचा मोदी सरकारला विरोध असूनही त्यांनी बंदपासून दूर राहणेच पसंत केले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मात्र बंद मध्ये सहभागी झाली. बंदच्या निमित्ताने राजकीय शक्तींची फेरजुळणी कशी होतेय यावर राजकारणाचीही दिशा अवलंबून होती. पण जनतेच्या प्रश्‍नावर समस्त विरोधकांची आघाडी करण्यात कॉंग्रेसही कमी पडली हे यानिमित्ताने दिसून आले आहे. राजकीय पक्षांना बंद सारख्या हत्यारांचा उपयोग स्वत:चा प्रभाव वाढवण्यासाठी करायचा असतो.
कॉंग्रेसने त्याचा वापर करून आता आपल्यालाही जाग आल्याचे दाखवून दिले आहे. पण त्यांना जनतेचा आक्रोश प्रभावीपणे मांडता आलेला नाही. इंधन दरवाढीच्या अर्थकारणाचे नेमके मर्म अजून कॉंग्रेसच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांना नेमकेपणाने मांडता येत नाही. त्यांचा अभ्यास कमी पडतो आहे. त्यांच्या आंदोलनातील घोषणांमध्येही काही नावीन्य किंवा चमकदारपणा नव्हता. विरोध त्वेषाने करायचा असतो, तो त्वेषही प्रभावीपणे त्यांना दाखवता आला नाही. अर्थात विरोधकांतल्या या कमजोरीमुळे मोदी सरकार उजवे ठरत नाही हेही तितकेच खरे आहे. मोदींनी आणि त्यांच्या यंत्रणेने देशात बरेच काही केल्याचा आव आणला असला तरी त्यांची गेल्या चार वर्षातील कामगिरी अत्यंत तोकडी पडली आहे. वर नमूद केल्याप्रमाणे त्यांना देशाचे आर्थिक व्यवस्थापन जमलेले नाही. निर्यातवाढ, निर्मिती क्षेत्र, गुंतवणूक, इत्यादी बाबतीत त्यांना साफ अपयश आले असून अर्थमंत्री म्हणून जेटलीच पूर्ण अपयशी ठरले आहेत.
मोदी सरकारची सारी मदार त्यांच्यावर अवलंबून आहे पण जेटली यांना कोणत्याच बाबतीत कौशल्य दाखवता आलेले नाही. लोकांना इंधनदरवाढ, बेरोजगारी आणि महागाई असह्य झाली आहे त्यांना ताबडतोब दिलासा हवा आहे. उत्पादन शुल्कात कपात हा इंधन दरवाढीवरील एकमेव पर्याय समोर असताना मोदी सरकार ढिम्म हललेले नाही. लोकांना दिलासा देण्यासाठी एखाद्या सरकारने तोंडदेखल्या तरी काही हालचाली केल्या असत्या पण तितक्‍याही हालचाली करताना हे सरकार दिसत नाही. लोकांच्या असंतोषाचा सरकारवर यत्किंचितही परिणाम झालेला दिसत नाही. झोपेचे सोंग आणलेल्यांना आता जागे करण्याची गरज होती.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)