झेड.पी. शाळेचा स्लॅब कोसळून तीन मुलांचा मृत्यू

नगर – नगर तालुक्‍यातील निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचा स्लॅब कोसळल्याने तीन मुलांचा मृत्यू झाला, तर वर्गशिक्षिकेसह 14 मुले जखमी झाली. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सोमवारी सायंकाळी 4.50 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. शाळा सुटण्यास दहा मिनिटे असतानाच अचानक स्लॅब कोसळल्याने एकच धावपळ उडाली. ग्रामस्थांसह परिसरातील अनेक गावांच्या लोकांनी जेसीबीच्या साहाय्याने ढिगारे बाजूला करून मुलांना बाहेर काढले. त्यानंतर तातडीने मिळेल त्या वाहनाने जखमी झालेल्या मुलांना जिल्हा शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना त्यातील तीन मुलांचा मृत्यू झाला.

या घटनेत सुमित सुनील भिंगारदिवे, श्रेयश प्रवीण रहाणे व वैष्णवी प्रकाश पोटे या तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर, वर्गशिक्षिका लीना सुभाषचंद्र पाटील यांच्यासह 14 मुले जखमी झाले. त्यात मंथन उमेश साठे, आरती विजय निंबाळकर, कश्‍यप नजीर शेख, प्रज्वल सुशांत भिंगारदिवे, प्रथम अशोक पवार, अनिकेत सुभाष साठे, गौरव कृष्णा वाघुले, नेट संजय वैरागर, संचिता संतोष भिंगारदिवे, शरद शिवाजी राठोड, मानसी महादेव भिंगारदिवे, गणेश संजय एकशिंगे, प्रांजली वाघ ही मुले जखमी झाली आहेत. या जखमींना डोक्‍यावर, पाय व हातांवर मार लागला आहे. दोन मुलांच्या कानांवर मार लागला आहे.
नगर शहरापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर जामखेड रस्त्यावर निंबोडी गावात आज सोमवारी सायंकाळी या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली. गावात पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. नेहमीप्रमाणे शाळा भरली. दुपारी 3 नंतर परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला. 36 विद्यार्थ्यांचा पट असलेल्या इयत्ता पाचवीच्या वर्गात आज 35 मुले हजर होती. सायंकाळी शाळा सुटण्यास काही वेळ बाकी असताना पाऊस कमी झाल्याने या वर्गातील काही मुले वर्गाबाहेर पडली होती. तर, काही मुलांसह वर्गशिक्षिका वर्गात होती. सर्व मुले व वर्गशिक्षिका शाळा सुटणार म्हणून वर्गाच्या बाहेर पडणार होते. त्याचवेळी अचानक वर्गाचा स्लॅब पत्त्यासारखा कोसळला. त्यावेळी वर्गात वर्गशिक्षिकेसह 15 ते 16 मुले होती. अचानक स्लॅब कोसळल्याने एकच हाहाकार झाला. वर्गखोलीच्या शेजारी असलेल्या अन्य शिक्षकांसह ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली. कोसळलेल्या स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली मुले अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू करण्यात आली. या ढिगाऱ्याखाली किती मुले अडकली हे कळायला मार्ग नव्हता. परंतु, हा ढिगारा उपसणे माणसांना शक्‍य नसल्याने तातडीने जेसीबी बोलविण्यात आला. दरम्यान, या ढिगाऱ्यातून काही मुलांना बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. परंतु, काही मुले ढिगाऱ्यात अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीशिवाय पर्याय नव्हता. तातडीने जेसीबी उपलब्ध करून ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले. ढिगारे बाजूला करून मुलांना बाहेर काढण्यात आले. जशी मुले ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात येत होती तसे त्यांना तातडीने मिळेल त्या वाहनाने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात येत होते.

जखमी मुलांना रिक्षा, टेम्पो रिक्षा, मोटारसायकल यावर ग्रामस्थांसह परिसरातील गावांमधील लोकांनी तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. इयत्ता पाचवीचा हा वर्ग पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे, उपाध्यक्ष राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, संभाजी दहातोंडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून जखमी झालेल्या मुलांना तातडीने रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली.
गंभीर जखमी मुलांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, उर्वरित मुलांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात एकच गर्दी होती. त्याच वेळी खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या दोघा मुलांचा मृत्यू झाला, तर एकाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्हा परिषद अध्यक्षा विखे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, उपाध्यक्ष घुले, हराळ, दहातोंडे, माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे, नगरसेवक योगिराज गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.

शाळेचा स्लॅब पडण्याची घटना दुर्दैवी असून या घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे. ज्या ठेकेदाराने या खोलीचे बांधकाम केले त्याच्यावरही कारवाई केली जाणार असून, ज्या अभियंत्याने या खोलीची पाहणी करून ती योग्य असल्याचा परवाना दिला त्याच्यावरदेखील कारवाई केली जाणार आहे. सध्या तरी या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्व मुलांचा वैद्यकीय खर्च जिल्हा परिषद करणार आहे. – शालिनीताई विखे जिल्हा परिषद अध्यक्षा

शाळा खोलीचे बांधकाम 1997-98 मध्ये झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेत दोषी असलेल्यांवर कारवाई तर केली जाणार आहेच, पण त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहे. धोकादायक असलेल्या शाळा खोल्यांमध्ये मुलांना न बसविण्याचे आदेश दिले आहेत. नियोजन समितीने शाळा खोल्यांसाठी दिलेल्या निधीची माहिती घेण्यात येईल. तसेच, निर्लिखित करण्यात आलेल्या शाळाखोल्या पाडण्याबाबतची कार्यवाहीदेखील करण्यात येईल.
– विश्‍वजित माने मुख्य कार्यकारी अधिकारी

प्रशासन जबाबदार – आ. जगताप
महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या शाळांसह अन्य इमारतींचे ऑडिट होणे आवश्‍यक आहे; ते होत नसल्याने अशा दुर्घटना घडतात. मंत्रालयाला आग लागली की शासन जागे होते, त्यानंतर ते होऊ नये म्हणून कार्यवाही केली जाते. परंतु, अशा घटना होऊच नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात नाहीत. याला प्रशासन जबाबदार आहे. या खोलीबाबत अभियंत्यांनी पाहणी करणे आवश्‍यक होते. वेळीच ग्रामस्थांच्या सूचनांची अंमलबजावणी होत नाही; त्यामुळे अशा घटना घडतात. याला प्रशासन जबाबदार असून दोषीवर कारवाई झाली पाहिजे, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्‍त केले.

याला झेड.पी.च जबाबदार- आ. कर्डिले
जिल्हा नियोजन समितीकडून शाळा खोल्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. परंतु, तो खर्च होत नाही. वेळोवेळी जिल्हा परिषदेने शाळा, अंगणवाड्यांसह अन्य इमारतींचे ऑडिट केले पाहिजे. ज्या धोकादायक इमारती आहेत त्या पाडल्या पाहिजेत. परंतु, ते काम जिल्हा परिषद वेळच्या वेळी करत नाही, त्यामुळे अशा घटना घडतात. याला जिल्हा परिषद जबाबदार आहे.
आ. शिवाजीराव कर्डिले

उपाध्यक्षा रुग्णालयात तळ ठोकून
उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी घटना घडल्यानंतर निंबोडी गावात जाऊन आल्या. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात जखमी मुलांची भेट घेऊन त्या रुग्णालयात तळ ठोकून होत्या. जखमींना तातडीने व्यवस्थित उपचार व्हावेत, तसेच पालकांना धीर देण्याचे काम त्या करत होत्या. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संवाद साधून वैद्यकीय उपचारांबाबत माहिती घेऊन त्या पद्धतीने रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)