‘झेडपी’ शाळांच्या आवारातील विजेचे खांब हटविणार

जामखेड, दि. 30 (प्रतिनिधी) – तालुक्‍यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या आवारात असलेले विजेचे खांब व विद्युत तारा काढून घेण्याबाबत अंदाजपत्रक तयार करून ते विभागीय कार्यालयाची मंजुरी घेऊन हा प्रश्‍न लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे आश्‍वासन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता युवराज परदेशी यांनी दिले.
जामखेड येथील महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहक तक्रार निवारण व सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते; त्यावेळी परदेशी यांनी ही माहिती दिली. या मेळाव्यात नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, पंचायत समितीचे उपसभापती सूर्यकांत मोरे, गोरोबा पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठल राऊत, नगरसेवक बिभिषण धनवडे, गणेश आजबे, संदीप गायकवाड, भाजपचे प्रसिद्धीप्रमुख उध्दव हुलगुडे, पीपल एज्युकेशन संस्थेचे संचालक राजेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, सहायक अभियंता वैभव थोरे, योगेश पगार, पुष्कराज मेंगाळ, हिरामण गावीत, देविदास सुपेकर, रवींद्र माळवदे, संदीप तिकटे, पुष्पा म्हेत्रे, आदींसह ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथमच जामखेड येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात संभाजी ब्रिगेडचे सावंत म्हणाले, “”जामखेड तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये वीजवितरण कंपनीच्या तारा, पोल असल्याने याचा धोका शाळेतील मुलांना होऊ शकतो, दुर्घटना घडू शकते. यासंदर्भात अनेक वर्षांपासून शाळेतील शिक्षक व व्यवस्थापन समितीने निवेदने दिली आहेत. याचा विचार करून हा प्रश्‍न तातडीने मार्गी लावावा. काही ग्राहकांच्या बिलामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत. अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत आहे. याला जबाबदार आपले वायरमन असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
परदेशी म्हणाले, “”जिल्हा परिषद शाळांसंदर्भात आलेल्या तक्रारी दखल घेऊन आठ दिवसांत त्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठविला जाईल. यावर तातडीने कारवाई केली जाईल. ग्राहक मेळाव्यात 33 तक्रारींपैकी 9 तक्रारींचे जागेवरच निवारण करण्यात आले. यापुढे महिन्याच्या चौथ्या सोमवारी ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या तक्रारी या मेळाव्यात मांडाव्या; त्याचे तातडीने निवारण करण्यात येईल.
यावेळी रेडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील विजेचे खांब व तारा काढण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने अशोक रेडे, अंबादास रेडे, बळीराम रेडे, अर्जुन रेडे, बापू रेडे, शिक्षक प्रताप पवार यांनी निवेदनाद्वारे केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)