झेडपीच्या तरतुदीमुळे खेळांडू झेपावणार

यंदाच्या अर्थसंकल्पात खास तरतूद : प्रोत्साहनपर अनुदान
———————-
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 28 – विविध खेळात तरबेज असलेल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर खेळता येत नाही. पैसाअभावी त्यांना त्यांचा खेळ अर्ध्यावरच सोडावा लागतो. परंतू, या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुणे जिल्ह्यातून जास्तीत जास्त खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जावे या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या अर्थसंकल्पात खास तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या क्रिडा स्पर्धांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार असून, हा निर्णय खेळांडूसाठी “गरूड झेप’ ठरणार आहे.

विविध खेळांमध्ये नैपुण्य असलेली बहुतांश मुले – मुली ग्रामीण भागातून आलेली असतात. उदाहरणच सांगायचे म्हटले तर ललिता बाबर. यांनी खडतर परिस्थितीवर मात करत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल केले. अशाच प्रकारे अनेक ग्रामीण भागातील खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय एवढच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छबी उमटवली आहे. परंतू, जिल्हा स्तरावरून राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर जाणाऱ्या खेळाडूंची संख्या तुलनेने खूपच कमी आहे. कारण, ही मुले खेळामध्ये कितीही तरबेज असले तरी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आडवी येते. त्यामुळे अनेक खेळाडू जिल्हास्तरावरून पुढे जाण्याचा विचारच करत नाही. काहींनी केला तरी, त्यांना राज्य किंवा राष्ट्रीयस्तरावर जाण्यासाठी आवश्‍यक असलेले प्रशिक्षण मिळत नाही. त्यामुळे खेळाडू आपोआप त्या खेळापासून बाजूला होतो.

या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा परिषदेने यावर्षी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारामध्ये नैपुष्य मिळवितात. त्यांची राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर निवड होते. मात्र, त्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारे, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रवास भत्ता यासाठी मोठा खर्च येतो आणि हा खर्च या मुलांच्या पालकांना परवडणारा नसतो. त्यामुळे यापुढे एखाद्या क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्याची राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यास त्याला 25 हजार रूपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 20 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या अनुदानामुळे विद्यार्थ्यांच्या खेळाडू वृत्तीला चालना मिळणार असून, ग्रामीण भागातून चांगले खेळाडू निर्माण होतील.

कोट-
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर निवड होते. मात्र, पैसाअभावी ही मुले पुढे जावू शकत नाही. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त खेळाडून राष्ट्रीय किंवा अंतराराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचावे यासाठी जिल्हा परिषदेकडून विद्यार्थ्यांना “प्रोत्साहनपर अनुदान’ देण्यात येणार आहे. ही योजना पहिल्यांदाच राबविली जात असून, आवश्‍यक वाटल्यास निधीमध्ये आणखीन वाढ करण्यात येईल.
विवेक वळसे-पाटील, उपाध्यक्ष – जिल्हा परिषद.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)