‘झिरो पेन्डन्सी’मुळे राज्याच्या विकासाची गती वाढणार

विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी 


विधानभवन येथे पार पडली कार्यशाळा

पुणे- लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासन देण्याचे “झिरो पेंडन्सी’ हे प्रभावी साधन आहे. या माध्यमातून सामान्य जनतेच्या अपेक्षांची पूर्तता होवून राज्याच्या विकासाची गती वाढण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले.

विधानभवन येथे आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या राज्यातील सर्व अधिकाऱ्यांसाठी “झिरो पेंडन्सी अॅन्ड डेली डिस्पोजल’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत दळवी बोलत होते. यावेळी माहिती जनसंपर्क विभागाचे संचालक अजय अंबेकर, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रा. ना. मुसळे, औरंगाबाद विभागाचे संचालक (माहिती) देवेंद्र भुजबळ, नागपूर-अमरावती विभागाचे संचालक (माहिती) राधाकृष्ण मुळी, उपसंचालक सतिश लळीत, उपसंचालक मोहन राठोड, उपसंचालक गणेश मुळे, उपसंचालक यशवंत भंडारे, उपसंचालक किरण मोघे यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हा माहिती अधिकारी व सहाय्यक संचालक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दळवी म्हणाले, माहिती व जनसंपर्क विभाग हा शासनाचा अत्यंत महत्वाचा विभाग आहे. शासनाची सकारात्मक बाजू आणि विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम हा विभाग करत असतो. या विभागाचे महासंचालक तथा सचिव ब्रिजेश सिंह यांनी अत्यंत सकारात्मकपणे झिरो पेन्डन्सी अभियान माहिती जनसंपर्क विभागाच्या राज्यातील प्रत्येक कार्यालयात लागू करण्याचे सांगितले आहे. राज्य शासनाने झिरो पेन्डन्सीचा शासन निर्णय घेतल्यानंतर पहिलीच राज्यस्तरीय कार्यशाळा पुण्यात होत आहे. या विभागाने या विषयात घेतलेल्या पुढाकाराचा निश्‍चितच इतर विभागांवर सकारात्मक परिणाम होणार आहे.

अंबेकर म्हणाले, झिरो पेन्डसीचा चांगला परिणाम पुणे विभागात झाल्याचे दिसत आहे. या अभियानाची परिणामकारकता लक्षात घेवूनच तो संपूर्ण राज्यात राबविण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांतही आत्मविश्‍वास वाढतो. या उपक्रमाची अंमलबाजावणी अत्यंत काटेकोरपणे करून प्रशासन अधिक लोकाभिमूख व गतिमान करण्यावर आम्ही भर देणार आहे. येत्या 1 मे पर्यंत माहिती जनसंपर्क विभागात 100 टक्के झिरो पेंडन्सी करणार असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसंचालक मोहन राठोड यांनी केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी केले.

कामांचा निपटारा होण्याची गरज
जनतेला चांगले प्रशासन देण्याचे आपले काम आहे. चांगले प्रशासन असेल तर सर्व प्रश्‍न मिटतात. विकासकामांना गती मिळते. जनतेच्या कल्याणासाठी शासनाच्या अनेक महत्वाकांक्षी योजना आहेत, या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होण्यासाठी वेळेत कामांचा निपटारा होण्याची आवश्‍यकता आहे. वर्षानुवर्षे जनतेची अनेक प्रकरणे प्रलंबित असतात. ती तातडीने मार्गी लावली पाहिजेत. कामकाजातील विलंब टाळून ठराविक कालमर्यादेत नागरीकांची आणि प्रशासकीय कामे तातडीने निपटून लोकाभिमुख व गतिमान प्रशासन देण्यासाठी या अभियानाची सर्व विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्‍यकता आहे, असे चंद्रकांत दळवी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)