झारगवाडीतील सावकाराच्या मुसक्‍या आवळल्या

बारामती पोलीसांची कारवाई; गुन्हा दाखल करीत सहा जणांना केले जेरबंद
डोर्लेवाडी – पुणे ग्रामीणच्या अधिकाऱ्यांनी धाडसी कारवाई करीत एकाच घरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सहा जणांवर सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे. जिथे स्थानिक पोलीस जायलाही घाबरत होते, त्याठिकाणाहूनच आरोपींच्या मुसक्‍या आवळण्यात आल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी रुद्रावतार घेतल्याने गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या एक तासांत सर्व आरोपींना जेरबंद केले. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची खासगी सावकारांवर कडक कारवाईच्या धोरणाची पुणे जिल्ह्यातील ही पहिली आणि सगळ्यात मोठी कारवाई ठरली आहे.

बारामती तालुक्‍यातील झारगडवाडी येथील आज्या हांकाऱ्या भोसले, बेंबट्या आज्या भोसले, विज्या आज्या भोसले, दत्त्या आज्या भोसले, चैत्री आज्या भोसले, आश्‍विनी बेबट्या भोसले या सहा सावकारांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याबाबत संजय सर्जेराव पवार (वय 44, रा. जळोची, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, संजय पवार यांना पैशांची गरज होती म्हणून व्याजाने कोणी पैसे देते का? याबाबत झारगडवाडीतील शौलेश थोरात यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा हंगाऱ्या भोसले व त्यांचा मुलगा विज्या भोसले, हे व्याजाने पैसे देतात; परंतु, हमी म्हणून दोन कोरे धनादेश व अधारकार्ड घेतात. त्यांना ओळखतो त्यांचे घरही माहित असल्याचेही थोरात यांनी सांगितले. पवार यांना गरज असल्याने त्यांनी भोसलेंकडून व्याजाने पैसे घ्यायचे ठरवले. 27 एप्रिल 2018ला संध्याकाळी 07:30च्या सुमारास पवार दुचाकीने (एमएच 42 एएन 2484) दोन कोरे धनादेश घेऊन झारगडवाडी येथे आज्या भोसलेच्या घरी गेले, त्यावेळी तेथे भोसले कुटुंब उपस्थित होते. 20 हजार रुपये व्याजाने हवे असल्याचे पवार यांनी भोसलेला सांगितले.

त्यावर भोसले म्हणाले की, दरमहा शेकड्याला 10 रुपये व्याज घेणार. 20 हजार रुपयांला महिन्याला 2 हजार रुपये द्यावे लागतील. तसेच मुदतीत व्याजाचे पैसे नाही मिळाले तर महिन्याचे व्याज आठवड्याला द्यावे लागेल, असे सांगितले. याला पवार तयार झाले, त्यांनी अधारकार्ड व दोन धनादेश सही करून घेतले. दुसऱ्या दिवशी 28 एप्रिल 2018ला दुपारी दोनच्या सुमारास पवार हे झारगडवाडीत भोसलेच्या घरी गेले त्यावेळी संपूर्ण भोसले कुटुंब आले व 20 रुपये शेकड्याने व्याज द्यावे लागेल, पैसे घ्यायचे तर घे नाहीतर धनादेश आम्हाला वाटेल ती रक्कम टाकुन बॅंकेतून वटवू, असे सांगू लागले. यालाही पवार तयार झाले. त्यानंतर आज्या भोसले याला दर महिन्याला चार हजार रुपये व्याज त्याचे घरी नेवून दिले. 20 हजार रुपयांच्या बदल्यात 7 महिन्यातील 12 हजार दिले आहेत. तर, 5 ऑगस्ट 2018ला सकाळी 11:00च्या सुमारास पवार यांची पत्नी वैशाली, मुलगा ऋषिकेश याला शाळा सोडविण्यास दुचाकीने गेली होती. त्यावेळी भोसले कुटुंब पवार यांच्या घरी आले व व्याज व मुदतीचे धरून 1 लाख 28 हजार रुपये दे, असे सांगितले.

पवार म्हणाले की, एवढे पैसे कसे झाले, तुमचे ठरलेले व्याज दर महिन्याला वेळच्या वेळी वेळी देत आहे, असे म्हणताच पवार यांना शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली तर आज्या भोसलेने धमकावत मोटारसायकलवर बसवून पवार यांना झारगडवाडीत घरी आणून जीवे मारण्याची धमकी देत डांबून ठेवले. पवार यांच्या पत्नीला भोसलेने मोबाईलवरून हा प्रकार सांगितला; त्यानंतर पवार यांची पत्नी झारगडवाडीत आली. त्यावेळी तिने 12 हजार 500 रुपये आणले होते. भोसले याने हे पैसे आणि गाडीही हिसकावून घेतली. पवार यांच्या पत्नीचा विनयभंग करीत मारहाण करून पवार यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे 10 हजार 940 किमतीचे सोन्याचे डोरलेही हिसकावून घेतले तसेच मोटारसायकल घेत हाकलून दिले. जीव वाचवून पवार कुटुंबीय घरी आले व हा प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर आज (शनिवारी) पोलीसांत तक्रार देण्यात आली. या घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने आदेश देत कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)