झाडे जगवा, एक महिन्याचे बस भाडे माफ

सोमाटणे – येथील बसवाले काका म्हणून ओळख असलेले हनुमंत मुऱ्हे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे. त्याअंतर्गत सुमारे विद्यार्थ्यांना सुमारे दीडशे रोपे लावण्यासाठी देण्यात आली. जे विद्यार्थी रोप जगवतील आणि वाढवतील त्यांना पुढील शैक्षणिक वर्षात एका महिन्याचे बस भाडे माफ करण्याची घोषणा मुऱ्हे यांनी केली आहे.

या उपक्रमाची सुरुवात उद्योजक अविनाश मुऱ्हे, सचिन मुऱ्हे, लॉयन क्‍लबचे भूपेंदरसिंग डुलत, सरपंच नलिनी गायकवाड, उपसरपंच सुजाता मुऱ्हे, माजी उपसरपंच राकेश मुऱ्हे, निलेश मुऱ्हे, गोकुळ गायकवाड, सोमनाथ मुऱ्हे, अजय मुऱ्हे आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोप देवून करण्यात आली.

मुऱ्हे हे गेली तीस वर्षांपासून विना अपघात विद्यार्थ्यांना शाळेत आणि घरी सोडत आहेत. आजतागायत त्यांच्याकडून एकदाही अपघात झाला नाही तसेच कोणतीही तक्रार आली नाही. याबद्दल मागील वर्षी मुऱ्हे यांना आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. मुऱ्हे यांनी अनेक गरजू व गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. तसेच काही विद्यार्थ्यांची शालेय फी भरण्यासाठी देखील आर्थिक मदत केली व काही मुलांची शैक्षणिक जबाबदारी देखील घेतली आहे. यावर्षी त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी उपक्रम राबवून प्रत्येक विदायार्थ्याला एक रोप भेट दिले. त्याच बरोबर जे विद्यार्थी रोप जगवतील आणि वाढवतील त्यांना पुढील शैक्षणिक वर्षात एका महिन्याचे बस भाडे माफ करण्याची योजना आखली आहे. विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला आहे.

या उपक्रमाविषयी मुऱ्हे म्हणाले की, मला मिळणाऱ्या उत्पन्नातून काही रक्कम मी समाजातील विविध गरजूंना मदत करण्यासाठी वापरत असतो. त्यातून मला मोठे समाधान मिळते. यापुढेही हा उपक्रम विविध पातळीवर चालू ठेवणार असून गावात घर तेथे वृक्ष हा उपक्रम राबविणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)