झाडे खिळेमुक्‍त करण्यासाठी तरुणाई सरसावली

निगडी, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड हे निसर्ग संपदेने समृद्ध शहर आहे. या उद्योग नगरीत मोठ्या प्रमाणात वृक्ष-वल्ली आहेत. मात्र ह्या झाडांना खिळे ठोकून जाहिराती, लिंबू-मिरच्या आणि नेत्यांच्या वाढदिवसाचे बॅनर सर्रास लावले जातात. खिळ्यांमुळे झाडांचे आयुष्य कमी होते. कायम स्वरुपी खिळे ठोकण्यात आलेल्या वृक्षांच्या वेदना कमी करण्यासाठी तरुणाई सरसावली असून काही सामाजिक संस्थांनी एकत्रित येऊन निगडी येथील भेळ चौक ते काच घर चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या झाडांना ठोकलेले खिळे आणि बांधलेल्या तारा काढल्या.

हा उपक्रम गेल्या एक महिन्यापासून पुण्यामध्ये आंघोळीची गोळी संस्थेद्वारे राबवण्यात येत आहे. पुण्यातील बहुतेक झाडे खिळेमुक्‍त केल्यानंतर आता संस्थेचे कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहरात आले आहेत. ह्यूमन सोसायटी, डोनेट एड आणि वेलनेस ग्रुप या संस्थांनी शहरातील 50 ते 60 झाडांचे जवळपास दीड किलो (235 नग) खिळे काढले. आंघोळीची गोळी संस्थेचे माधव पाटील यांनी दैनिक “प्रभात’ शी बोलताना सांगितले की, रस्त्याच्या कडेच्या झाडांवर झेरॉक्‍स, पंक्‍चर, शिकवण्या, नोकरीच्या जाहिरातीचे लावलेले फलक पाहायला मिळतात. झाडांच्या बुंध्याशी ऍसिड टाकून झाडांना हळूहळू मारण्याचे अघोरी प्रकार केले जातात. खिळे, तारा, ऍसिड ह्यामुळे झाडांचे आयुष्य कमी होते.

चिंचवड मधील ह्यूमन सोसायटीचे समाधान पाटील यांनी हे अभियान पिंपरी चिंचवडमध्ये राबवण्याचे ठरवले. नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी अभियानास शुभेच्छा दिल्या. यावेळी रोटरी क्‍लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर आणि सभासद सचिन काळभोर, सोमनाथ हरपुडे, गणेश बोरा तसेच डोनेट एडच्या किशोरी अग्निहोत्री, अश्विनी जलापुरे, निर्मला वंजारी, प्रगती मुंज, स्वामी विवेकानंद केंद्राचे रोहित शेणॉय, निखिल अग्निहोत्री उपस्थित होते. वेलनेस ग्रुपचे राहुल धनवे, बाळा शिंदे, उल्हास टकले यांनीही या अभियानात भाग घेतला. प्रत्येक मंगळवारी सकाळी 7 ते 9 ह्या हा उपक्रम शहराच्या विविध भागात राबवला जाणार आहे. ह्यात सहभागी होण्यासाठी किशोरी ( 9422262499) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन आंघोळीची गोळी संस्थेने केले आहे.

उच्च शिक्षित तरुणांचे प्रयत्न
आंघोळीची गोळी, ह्यूमन सोसायटी, डोनेट एड, वेलनेस ग्रुप संस्थांचे सदस्य हे उच्च शिक्षित आणि मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करणारे, तर काही चांगले व्यावसायिक आहेत. व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून ते हे काम नि:स्वार्थपणे करतात. काही खिळे खूप जुने आणि मोठे असतात. हे खिळे काढण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)