झाकिर नाईकला सहजासहजी भारताकडे सोपवणार नाही

मलेशियाच्या पंतप्रधानांची उद्दाम प्रतिक्रिया

कुआलांपूर (मलेशिया) – वादग्रस्त इस्लामी प्रचारक झाकिर नाईकला भारताच्या स्वाधीन करण्याची भारताची मागणी सहजासहजी मान्य केली जाणार नाही, असे मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहमद यांनी म्हटले आहे. तीनच दिवसांपूर्वी झाकिर नाईक याने पंतप्रधान महाथिर मोहमद यांची भेट घेतली होती. त्यानंतर झकीर नाईकबाबतच्या कोणत्याही मागण्यांबाबत सर्व घटकांकडे लक्ष देण्याची काळजी मलेशिया सरकारकडून घेतली जाईल, असे महाथिर यांनी म्हटले आहे, असे स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

“आम्ही इतरांच्या मागण्यांप्रमाणे सहजासहजी वागत नाही. कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी सर्व अंगांनी विचार करावाच लागतो. अन्यथा कोणीतरी विनाकारण बळी जाऊ शकतो.’ असे नाईकबाबत प्रथमच बोलताना महाथिर म्हणाले.
झकीर नाईकला भारताच्या स्वाधीन करण्याबाबत महाथिर यांनी गेल्या आठवड्यात स्पष्टिकरण दिले होते. झकीर नाईकला मलेशियाचे कायम रहिवाशाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे त्याला भारताच्या स्वाधीन केले जाणार नाही. झकीर नाईक 2016 साली भारतातून बाहेर पडला आहे. तो जोपर्यंत मलेशियामधील कायदा मोडत नाही, तोपर्यंत त्याला तेथे राहू दिले जाईल, असेही महाथिर यांनी म्हटले आहे.

झाकिर नाईककडून धन्यवाद
मलेशियाच्या पंतप्रधानांकडून अभय मिळाल्याने झकीर नाईकने मलेशिया सरकारचे आभार मानले आहेत. कोणताही पक्षपात न करता आपल्यावरील आरोपांची तपासणी करण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका योग्यच आहे. देशाच्या बहुविध वांशिक गटांमधील सौहार्दाच्या यशासाठी या आरोपांची शहानिशा योग्यप्रकारे होणे गरजेचे आहे, असे झाकिर नाईकने म्हटले आहे.

मलेशियाच्या न्याय आणि धार्मिक सौहार्दतेवर आपला विश्‍वास असल्याचा पुनरुच्चारही नाईकने केला आहे. गेल्या काही वर्षांपासून हजारो व्हिडीओ, व्हॉटस ऍप मेसेज, बातम्यांमधून आपल्यावर अशा कृत्यांचे आरोप केले गेले आहेत, जे आपण केलेलेच नाहीत, मलेशियातील सामाजिक सौहार्द आणि कायद्याचे आपण पूर्णपणे पालन करणार आहोत, याचे आश्‍वासनही त्याने दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)