झळकवा जगण्याचे दीड शतक (भाग १)

जोसेफ तुस्कानो

स्त्रज्ञांनी माणसाच्या आयुष्याशी निगडीत एज-1, एज-2, क्‍लोफ-2 अशा जनुकांचा शोध लावला आहे. शरीरावर वयाचा परिणाम केव्हा दिसू लागतो याचाही शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तरूण आणि मध्यमवयीन लोकांच्या जनुकसंहितेला स्कॅन करून याचे रहस्य उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 2050 पर्यंत माणसाचे आयुष्य वाढण्याची प्रक्रिया कमी करण्याचा मंत्र आपल्याकडे असेल असे शास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स यांनी म्हटले आहे. स्टेम सेल, टी ह्यूमन बॉडी शॉप आणि जीन थेरपी यांच्याद्वारे माणसाचे आयुष्य 150 वर्षांहूनही अधिक होण्याची शक्‍यता शास्त्रज्ञांना वाटते. खरंच असे होईल? 

प्रत्येकाला दीर्घायुष्य हवे असते. अगदी महात्मा गांधींनाही 125 वर्षे आयुष्य हवे होते. अर्थात त्यांची अशी इच्छा असण्यामागे त्यांना अनेक उद्दीष्टे पूर्ण करणे हे कारण होते. आपल्या जिवंतपणीच त्यांना त्यांची सर्व उद्दीष्टे पूर्ण झाल्याचे पाहायचे होते. आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवाचे आयुष्यमान वाढले आहे आणि शास्त्रज्ञही वय वाढण्याची प्रक्रिया मंद करण्यासाठी धडपडत आहेत. आता यासंदर्भात विज्ञानाची एक नवी शाखाच निर्माण झाली आहे. याला जराशास्त्र म्हणजे जेरॉटॉलॉजी असे म्हणतात. वय नियंत्रणात ठेवणारी जनुके शोधण्यासाठी या शास्त्राचे शास्त्रज्ञ पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत.

शास्त्रज्ञांनी एज-1, एज-2, क्‍लोफ-2 अशा प्रकारची काही गुणसूत्रे शोधून काढली आहेत. माणसाच्या शरीरावर वयाचा परिणाम केव्हा दिसून येतो हे शोधण्याचा प्रयत्नही शास्त्रज्ञ करत आहेत. तरूण आणि मध्यम वयाच्या लोकांच्या जिनोमचे स्कॅनिंग करून शास्त्रज्ञ हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ऑक्‍सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्रा. रिचर्ड डॉकिन्स यांचे म्हणणे आहे की 2050 पर्यंत वय वाढण्याची प्रक्रियेची गती कमी करण्याचा मंत्र सापडलेला असेल. स्टेम सेल, दी ह्यूमन बॉडी शॉप आणि जीन थेरपी यांच्या माध्यमातून माणसाचे आयुष्यमान 150 वर्षांहूनही अधिक करणे शक्‍य होणार आहे. आधुनिक युगात माणसाचे आयुष्यमान वाढत आहे. आपल्या देशात तर आयुष्यमान भव, चिरंजीवी भव असे आशीर्वाद नेहमीच दिले जातात. प्राचीन काळात भारतीय लोक दीर्घायुषी होते हे महाभारत, रामायण ही महाकाव्ये, पुराणे वाचल्यावर लक्षात येते. पितामह भीष्मांनी तर आपले मरणही रोखून धरले होते.

1990 मध्ये जगातील माणसांचे सरासरी आयुष्य 65.33 वर्षे होते. आता ते वाढून 71.5 वर्षे इतके झाले आहे. या दरम्यान पुरूषांचे आयुष्य सरासरी 5.8 वर्षांनी तर महिलांचे आयुष्य 6.6 वर्षांनी वाढले. सरासरी आयुष्य वाढत आहे, तसे वयाची शंभरी पार पडलेल्या लोकांची संख्याही वाढते आहे. आता शतायुषी होणे ही दुर्मिळ बाब राहिलेली नाही. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात तर नमूद करण्यात आले आहे की भारतात 12 हजारहून अधिक लोकांनी वयाची शंभरी पार केली आहे आणि 2050 पर्यंत अशा लोकांची संख्या आणखी वाढेल. जपान तर शतायुषी लोकसंख्येत जगात सर्वात पुढे आहे. तेथे प्रत्येक गावात दोन-चार जण तरी शंभरी पार केलेले आढळतातच. जपानच्या सरकारी आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 2014मध्ये जपानमध्ये 58 हजारहून अधिक शतायुषी वृद्ध होते. जगभरात वाढणारे सरासरी वय आणि शंभरी पार केलेल्या वृद्धांची संख्या पाहता माणसाचे आयुष्यमान वाढत आहे याची खात्री पटते. आरोग्य सेवांमध्ये झालेली वाढ आणि आरोग्याप्रती लोकांची वाढत असलेली जागरूकता यामुळे माणसाचे आयुष्यमान वाढत आहे. आपल्या देशातील पुरूषांचे सरासरी वय 64 आणि महिलांचे सरासरी आयुष्य 68 वर्षे आहे. गेल्या 40 वर्षांत पुरूष आणि महिलांचे सरासरी वय अनुक्रमे 15 आणि 18 वर्षांनी वाढले आहे.

वृद्धापकाळातील सक्रीयता 

निवृत्तीचे वय झाल्यानंतर बहुतांश लोक काही काम करण्याच्या किंवा सक्रिय राहण्याच्या मन:स्थितीत नसतात. इतकी वर्षे काम केले आता आराम करायचा, अशी भावना याआधी निवृत्त लोकांची असत असे. पण आता यात बदल होत आहे. निवृत्त झाल्यानंतरही लोक स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून घेत असतात. प्रत्येक वेळी हे काम म्हणजे नोकरीच असते असे नाही, तर त्यांना आवडणाऱ्या कामात किंवा छंद जोपासण्यात ते गुंग असतात. अनेकदा नव्याने नोकरीही करू लागतात. ऑस्ट्रेलियात तर वृद्धापकाळातील सक्रियता पाहून निवृत्तीचे वयच सत्तर वर्षे करण्याचे योजले आहे.

ऑस्ट्रेलियात 2014मध्ये एक कायदा मंजूर करण्यात आला असून त्यायोगे 2035 पासून तेथे निवृत्तीचे वय 70 वर्षे असेल. तेथील सरकार वृद्धांना कामावर घेण्यासाठी प्रोत्साहन आणि आर्थिक अनुदानही देते. भारत आणि चीन या देशांनी याबाबत विचार करणे आवश्‍यक आहे. कारण आज जरी हे देश युवकांचे असले तरी येत्या 25 ते 30 वर्षांच्या कालावधीत या दोन देशांतही वृद्धांची संख्या वाढलेली असेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)