भाजप आमदाराच्या मुलाला अटक
भोपाळ – कॉंग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्याबद्दल मध्यप्रदेशातील सत्तारूढ भाजपच्या आमदार उमादेवी खटीक यांच्या 19 वर्षीय मुलाला पोलिसांनी अटक केली.

प्रिंसदीप असे अटक करण्यात आलेल्या आमदारपुत्राचे नाव आहे. प्रिंसदीपने फेसबुकवर पोस्ट टाकून ज्योतिरादित्य यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली. हटा परिसराला भेट दिल्यास ज्योतिरादित्य यांना गोळ्या घालू, अशी धमकीही त्याने दिली. प्रिंसदीपची पोस्ट पाहिल्यावर काही कॉंग्रेस नेत्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या घडामोडीचा गाजावाजा झाल्यावर उमादेवी त्यांच्या मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात पोहचल्या. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली. उमादेवी यांचा हटा विधानसभा मतदारसंघ दमोह जिल्ह्यात येतो. ज्योतिरादित्य 5 सप्टेंबरला त्या जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर, प्रिंसदीपने ज्योतिरादित्य यांना धमकी दिली.

दरम्यान, कॉंग्रेस नेत्यांनी ज्योतिरादित्य यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली. तर त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी धमकी प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा खरा चेहरा समोर आल्याची टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)