ज्येष्ठ नागरिकांच्या सुश्रुषेसाठी मुंबईत धावणार ‘सायकल ऍम्बुलन्स’

मुंबई – मुंबईसह राज्यातील दुर्गम भागात मोटर बाईक ऍम्बुलन्सला मिळालेला प्रतिसाद पाहता वृद्धांच्या सुश्रुषेसाठी मुंबईच्या रस्त्यावर लवकरच सायकल ऍम्बुलन्स धावणार आहे. ही ऍम्बुलन्स प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार असून विलेपार्ले पूर्व व शिवाजी पार्क या भागाची त्यासाठी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.

वृद्धांना वाढत्या वयात अनेक शारीरिक समस्या भेडसावतात. अशा वेळेस त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्या प्रकृतीची तपासणी, रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात आहे की नाही याची तपासणी पॅरामेडिकलच्या माध्यमातून करण्यासाठी सायकल ऍम्बुलन्स सेवा उपयुक्त ठरणार आहे. मुंबईत विलेपार्ले पूर्व आणि शिवाजी पार्क या भागाची प्राथमिक स्तरावर निवड करण्यात आली असून तेथे ही सेवा सुरु करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे. या दोन्ही भागात प्रत्येकी सायकल देऊन पॅरामेडिकलच्या माध्यमातून वृद्धांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी सांगितले.

बाईक ऍम्बुलन्सच्या रचनेप्रमाणेच सायकल ऍम्बुलन्सची रचना असून प्रशिक्षित पॅरामेडिकल या ऍम्बुलन्सचा चालक असणार आहे. या सेवेसाठी एक बेस स्टेशन करण्यात येणार असून तेथून ज्येष्ठांशी संवाद साधला जाईल. या सर्व बाबींवर तांत्रिकदृष्ट्या कार्यवाही सुरु असून लवकरच हा विशेष प्रकल्प मुंबईत सुरु होईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईत वर्षभरापूर्वी बाईक ऍम्बुलन्स सुरु करण्यात आल्या होत्या. त्याच्या माध्यमातून हजारो रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्याने या सेवेचा विस्तार करीत नव्याने बाईक ऍम्बुलन्स मुंबई शहरात या वर्षी सुरु करण्यात आल्या. त्याचबरोबर पालघर, मेळघाट आणि गडचिरोली येथे ही सेवा सुरु करण्यात आली.

पालघर व मेळघाट येथे प्रत्येकी पाच तर गडचिरोली येथे एका बाईक ऍम्बुलन्सच्या माध्यमातून रुग्णांना सेवा दिली जात आहे. मुंबईत सुमारे तीन हजार पेक्षा जास्त तर पालघर, मेळघाट आणि गडचिरोली येथे साधारणत: पेक्षा अधिक रुग्णांना या सेवेच्या माध्यमातून जीवदान मिळाले आहे.

बाईक ऍम्बुलन्सची उपयुक्तता लक्षात घेता राज्यात पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर या महानगरांमध्येही चिंचोळ्या रस्त्यांतून वाट काढण्यासाठी ही सेवा सुरु करण्याचे शासनाचा मानस असल्याचे आरोग्यमत्र्यांनी सांगितले. याच धर्तीवर मुंबई शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या (जेरियाट्रिक) सुश्रुषेसाठी सायकल ऍम्बुलन्स ही नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)