ज्येष्ठांमध्ये दडलेल्या कलागुणांच्या सादरीकरणाने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त खराडी येथील अण्णासाहेब बेहरे वृद्धाश्रम व सिनिअर एक्सप्रेस यांच्या संयुक्त विद्यामाने कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : आजी-आजोबांसाठी विद्यार्थिनींनी सादर केलेली गीते, नृत्य, पोवाडे, नाटक यांचे कौतुक करीत ज्येष्ठ नागरिकांच्या चेह-यावर हास्य फुलले. बंगाली ग्रुपने सादर केलेले नृत्य, अंताक्षरी, जादुचे प्रयोग अशा वेगळ्या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद ज्येष्ठांनी लुटला. नाट्यवाचन, भारुडाद्वारे आपली कला सादर करण्यात ज्येष्ठ नागरिक दंग झाले. ज्येष्ठांमध्ये दडलेल्या कलागुणांच्या सादरीकरणाने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त खराडी येथील अण्णासाहेब बेहरे वृद्धाश्रम व सिनिअर एक्सप्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक प्र. न. गोळे, कुंदा वर्तक, दिलीप काळे, राहुल भाटे, निवृत्त कर्नल गौरव सिंग, सिनिअर एक्सप्रेसच्या संस्थापिका डॉ. निधी मिश्रा, उदीप कुलश्रेष्ठ, संदीप गव्हाणे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये विविध शाळांमधील तसेच संस्थेतील कर्मचा-यांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या लाडक्या आजी-आजोबांसाठी गीते, नृत्य, कविता, पोवाडे यांचे सादरीकरण केले. बंगाली ग्रुपने सादर केलेल्या बंगाली नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. देशभक्तीपर गीते, कोळीगीते अशा विविध गीतांवर आजी-आजोबांनी ठेका धरला. विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळकांवर सादर केलेल्या पोवाड्याच्या सादरीकरणाला उपस्थितांनी विशेष दाद दिली.
वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनीच सादर केलेल्या नाट्यवाचनाने उपस्थितांची मने जिंकली. वृद्धाश्रमातील आजींनी नणंद-भावजय यांच्यातील गमतीशीर भांडण दाखवित सादर केलेल्या भारुडाच्या सादरीकरणाने सर्वजण खळखळून हसले. जादुच्या प्रयोगांमधून जेष्ठ नागरिकांनी आपल्या लहानपणच्या आठवणींना उजाळा दिला. ज्येष्ठ नागरिकांच्या ग्रुपने सादर केलेल्या संगीताच्या कार्यक्रमाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)