ज्या त्या वर्षांचे पुरस्कार त्याच वर्षी द्या : अजित पवार

जिल्हा परिषदेच्या वतीने कृषीभूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषीनिष्ठ शेतकरी

शरद आदर्श कृषीग्राम आणि आदर्श गोपालक पुरस्काराचे वितरण

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 24 – उन्हा-तान्हात राबून, निसर्गाशी लढून शेतकरी त्या वर्षातले पिक त्याच वर्षी काढतो. त्या माझ्या शेतकरी बांधवाला 2014 च्या पुरस्कारासाठी 2018 पर्यंत वाट का पाहावी लागते, असा प्रश्‍न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित करत “मेहरबानी करा आणि ज्या त्या वर्षांचे पुरस्कार त्याच वर्षी द्यावे, अशी कान उघडणी अजित पवार यांनी केली.

पुणे जिल्हा परिषद कृषीभूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषीनिष्ठ शेतकरी, शरद आदर्श कृषीग्राम आणि आदर्श गोपालक पुरस्काराचे वितरण माजी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, कृषी व पशु समितीच्या सभापती सुजाता पवार, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके, समाजकल्याण समितीच्या सभापती सुरेखा चौरे, बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रविण माने, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष जालींदर कामठे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले आदी उपस्थित होते.

“एमपीएससी’, “युपीएससी’ देऊन अधिकारी बनलेले शेतकऱ्यांचीच मुले आहेत. त्यामुळे माझ्या काळ्या आईची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्या त्या वर्षीचे पुरस्कार त्या वर्षी देण्यासाठी प्रयत्न करावे, असा सूचना अजित पवार यांनी दिल्या. पुरस्कारामध्ये वशिलेबाजी नसावी, जे उत्तम काम करतात त्यांच्या कामाचे कौतुक आवश्‍य झाले पाहिजे. त्याचबरोबर पुरस्कार्थींनी शेतीत केलेले बदल समाजाला सांगावे, जेणेकरून उत्पादनवाढीत त्याचा फायदा होईल. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दुरदृष्टी ठेवून कृषी विज्ञान केंद्रांना मंजुरी दिली. त्यामुळे अनेक संशोधने झाली. वाढते औद्योगीकरण आणि नागरीकरणामुळे चार पदरी रस्ते, विमानतळ, रिंग रोड, शहराचे वाढीव विस्तार, कंपन्या, धरणे यासाठी मोठ्या प्रमाणात जागा ताब्यात घेतल्या जात आहे. त्यामुळे शेती लागवडीचे क्षेत्र कमी होत आहे.
यावेळी विश्‍वासराव देवकाते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सभापती सुजाता पवार यांनी केले.

……………..
सरकारला अधिकारी डोईजड
माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे शेतकऱ्यांची नाडी ओळखणारे नेते आहेत. राज्यात अवकाळी पाऊस झाल्यावर आम्ही साहेबांना फोन करून सांगितल्यावर ते लागलीच “टीम पाठवतो, पाहणी करा’ असे सांगायचे. मात्र, आता पाहणी करायला टीम “घोड्यावरून’ येते. मराठवाड्यात रात्रीच्या वेळी बॅटरी लावून पाहणी करायला गेल्याचे समोर आले. यांच्या “काकांनी’ रात्रीची पाहणी केली होती का? असा हल्लाबोल करत, या सरकारने आता उंदीर मारण्यातही भ्रष्टाचार केला. सगळा पोरखेळ सुरू आहे. या सरकारला अधिकारी डोईजड झाले आहेत. हे घोषणा करतात आणि अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. आमच्या काळात असे कधी झाले नाही. अधिकारी वर्गाकडून काम करून घेण्याची धमक आणि ताकद नेतृत्वामध्ये पाहिजे. दुर्दवैवाने ती पहायला मिळत नाही. सत्तेवर येण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीमालाला दीडपट भाव देतो असे सांगितले. मात्र, सत्तेत आल्यावर दीड पट भाव दिला नाही. केवळ मतांसाठी राजकारण केले जात आहे. हा सर्व खोटारडेपणा बाहेर काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन 2 एप्रिलपासून कोल्हापूर येथून “हल्लाबोला’ सुरुवात होणार आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे या भागांतून हा हल्लाबोल मोर्चा निघणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)