ज्याचे मन प्रसन्न असते, तोच पोहचतो ईश्‍वराजवळ !

भोसरी – ज्याचे मन प्रसन्न असते, तोच ईश्‍वराजवळ पोहचतो. तोच स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार असतो. त्यासाठी एक छोटीशी गोष्ट ध्यानात ठेवा की, कोणतीही गोष्ट मनात ठेवू नका. भले ती चांगली असो वा वाईट, कोणाला तरी सांगा. चांगल्या गोष्टी पत्नीला सांगा, उपकाराच्या गोष्टी मुलांना सांगा, ते संस्कारित होतील. प्रेम वाढविण्याच्या गोष्टी भावाला-मित्रांना सांगा, त्यामुळे एक संघ घराच्या चौकटीत राहील, असे प्रतिपादन उपप्रवर्तनी साध्वी मंजुलज्योतिजी म.सा. यांनी चातुर्मास प्रवचना दरम्यान केले.
भोसरी येथे सुरू असलेल्या चातुर्मास प्रवचना दरम्यान उपप्रवर्तनी साध्वी मंजुलज्योतिजी म.सा. म्हणाल्या की, आपसातील प्रेम वाढले तर घर स्वर्गाप्रमाणे आनंदी होईल. वाईट गोष्टी मोकळ्या माळरानावर ज्या, त्या ईश्‍वराला सांगा, त्यामुळे मनावरील बोजा कमी होईल. मनावर ओझे झाले की, तुमचे आयुष्य कमी झालेच असे समजावे. त्यासाठी “मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण’ हे संत रामदासस्वामींनी “मनाचे श्‍लोक’ माध्यमातून स्पष्ट केले आहे. जैन मुनी तरुणसागरजी महाराज यांनी कटू प्रवचनांमध्ये सह उदाहरण स्पष्ट केले आहे.
आपले पुत्र-पुत्री आज्ञाधारक, कुलाचार पाळणाऱ्या कशा जन्म घेतील, या विषयीचा प्रश्‍न गौतम स्वामींनी भगवान महावीर स्वामींना विचारला होता. आगम या धर्मशास्त्रात महाविरांनी याचे उत्तर समस्त मानव जातीला दिले आहे. भगवंत म्हणाले, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा, ते दुःख हलके होण्यासाठी दुसऱ्याला मदत करा. त्याचा बोलबाला करू नका. एक वेळ आनंदात सहभागी झाला नाहीत तरी चालेल. परंतु दुःखात सहभागी व्हा. संकटे पचविण्यासाठी आत्मिक बळ द्या. हे कर्म आपले पुत्र-पुत्री आज्ञाधारक करण्यासाठी मदत करतील. कुटुंबाची माता-पिता-समाज यांची सदैव काळजी घेतील. आई-वडिलांच्या सुखासाठी ते तत्पर राहतील. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भीष्म पितामह यांनी आयुष्यभर संसाराचा त्याग केला. दुसऱ्याचे दुःख पाहून आनंद माननारे अपयशी असतात. आयुष्यभर ते कलंकीत जखम बाळगत जगतात. त्यासाठी मन सदैव प्रसन्न ठेवा, फळ गोडच मिळेल.

गुरु आनंद गाथा प्रथम पुष्प
मधुर व्याख्याती स्पष्टवक्‍ता साध्वी वसुधाजी महाराज यांनी गुरु आनंद ऋषिजी यांच्या 118 व्या जयंतीनिमित्त “गुरु आनंद गाथा’ चे प्रथम पुष्प गुंफले. आपल्या व्याख्यानात त्यांनी पिता देवीचंदजी व माता हुलसा यांचे पुत्र नेमीकुमार यांचा जन्मप्रसंग सांगितला. माते संस्कार आणि पित्याची इच्छा म्हणजे नेमीकुमार होय. शिकून खूप मोठा हो, एकासाठी न जगता, जगासाठी जग हे विचारच त्यांच्यासाठी सर्वश्रेष्ठ ठरले. या कथामालेला मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. साध्वी मंजुलज्योतिजी यांच्या मार्गदर्शनाखाली साध्वी वंदिताजी, साध्वी विजेताजी, साध्वी वारिधाजी महाराज व साध्वी वसुधाजी यांनी विविध स्पर्धांचे आयोजन केले. या स्पर्धेत सुमारे 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)