“ज्ञानोबा-माऊली’, “पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’च्या जयघोषाने अलंकापुरी दुमदुमली

कार्तिकी एकादशीनिमित्त सुमारे तीन लाख भाविकांनी घेतले माउलींचे दर्शन


11 ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्र जयघोषात श्रींची लक्षवेधी पूजा

– एम. डी. पाखरे

आळंदी – “अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपूत्र’ या भावनेने माउलींचे आशीर्वाद घेण्यासाठी वैष्णवांची मांदियाळी सोमवारी आळंदीत अवतरली. निमित्त होते कार्तिकी एकादशीचे. सहभागी भाविकांनी ज्ञान, प्रेम अन्‌ भक्‍तीचा अनुपम्य सोहळा डोळ्यात साठवत माऊलींवरील निस्सीम श्रद्धेचा जणू प्रत्ययच दिला. “ज्ञानोबा-माऊली…’ असा जयघोष, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’चा नामगजर, टाळ, मृदंग, वीणेचा त्रिनाद आणि हरिनामाचा जयघोष करीत लाखो भाविकांनी कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींच्या समाधीचे दर्शन घेतले. संजीवन समाधीवर विविधरंगी फुलांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टी होताच घंटानाद झाला आणि ज्ञानेश्‍वर महाराज यांचा 723वा संजीवन समाधी दिन सोहळा आळंदी मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरम्यान, आज सुमारे तीन लाख भाविकांनी माउलींचे दर्शन घेतले.

माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत विविध कार्यक्रमांचे आयोजन संजीवन समाधी मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे. पहाटपूजेपूर्वी दर्शनबारीतील येणारी भक्‍तांची रांग माउलींच्या पवमान पूजेसाठी बंद ठेवण्यात आली. विविध सेवक, सेवाभावी संस्था आणि स्वकाम सेवा मंडळाच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण देऊळवाडा स्वच्छ केला. तर घंटानाद झाल्यानंतर पहाटपूजेत माऊलींना अभिषेक व पूजा बांधण्यात आली. श्रींच्या पूजेचे पौरोहित्य राहुल जोशी यांनी केले.

यावेळी त्यांच्यासह 11 ब्रह्मवृदांच्या वेदमंत्रोच्चाराने, सनई चौघड्यांचा मंजूळ स्वरामुळे देऊळवाड्यातील वातावरण भक्‍तिमय उत्साहाने भारलेले होते. दरम्यान सिद्धेश्‍वर मंदिरातही रुद्राभिषेक सुरू होता. माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवण्यात आला. पंचामृत अभिषेक करताना दूध, दही, तूप, मध, साखर, सुगंधी तेल, उटणे अत्तर यांचा वापर करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर माउलींना विविध आकर्षक वस्त्रे आणि दागिन्यांनी सजविण्यात आले. विद्युत रोषणाई आणि रंगावलीकारांनी काढलेल्या रांगोळ्यांनी आळंदी मंदिर परिसर आकर्षक दिसत होता.

माउली मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांचे प्रथेप्रमाणे पालन करीत झाले. यात श्रींना महानैवेद्य झाल्यानंतर श्रींची पालखी मंदिरातून हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा दुपारी एक वाजता निघाली. दरम्यान, भाविक, वारकऱ्यांनी हरिनाम जयघोष करीत प्रदक्षिणेच्या मार्गावर दुतर्फा गर्दी करून श्रींच्या पालखीत दर्शन घेतले. हजेरी मारुती मंदिरात श्रींची पालखी काही वेळ विसावली. येथे परंपरेचे अभंग गायन, कीर्तन सेवेनंतर, हरीगजर, भाविकांचे दर्शन झाल्यानंतर पालखी रात्री मंदिरात चावडी चौकमार्गे परतली. मंदिरात प्रदक्षिणा झाल्यानंतर परंपरेने धुपारती झाली. त्यानंतर श्रींच्या पुढे संतोष मोझे (सरकार) यांच्या वतीने हरिजागर झाला.

पुजेप्रसंगी पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाचे आयुक्त आर. के. पद्‌मनाभन, उपायुक्त स्मार्तना पाटील, अतिरिक्‍त आयुक्‍त मकरंद रानडे, प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे-पाटील, विश्‍वस्त अजित कुलकर्णी, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, यात्रा समिती सभापती पारुबाई तापकीर, व्यवस्थापक माउली वीर, श्रीधर सरनाईक, मालक बाळासाहेब आरफळकर, आळंदी नगरपरिषदेचे आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, भाविक, निमंत्रित उपस्थित होते.

पुष्पसजावटीमुळे माउलींचे लोभसवाणे रुप 
दरवर्षीप्रमाणे इंद्रायणी नदीचा तीर माउली नामाच्या अखंड गजरात अक्षरशः बुडून गेला होता. थंडीची तमा न बाळगता अनेक भाविक नदीत स्नान करून स्वतःला पवित्र मानत होते. पहाटेचे थंड वातावरणात आणि सनई चौघड्याच्या मंजुळ स्वरात माउलींच्या समाधीला पवमान अभिषेक करण्यात आला. घंटानाद झाल्यानंतर सव्वाबारा ते दीड वाजेपर्यंत माउलींना अभिषेक व पूजा बांधण्यात आली. माउलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवल्यानंतर आणि पुष्पसजावटीमुळे हे रूप लोभसवाणे दिसत होते.

“श्रीं’चा आज रथोत्सव
द्वादशीदिनी मंगळवारी (दि. 4) पहाटे 2 ते 3.30 श्रींना पवमान अभिषेक व दुधारती होणार आहे. यानंतर 3.30 ते 4 यावेळेत प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते पंचोपचार पूजा होईल. यानंतर भाविकांच्या महापूजा आणि दर्शनासाठी श्रींचा गाभारा खुला होईल. दरम्यान, सायंकाळी चारच्या सुमारास श्रींचा रथोत्सव होणार आहे. यावेळी श्रींची पालखी खांद्यावर घेत हरिनाम गजरात गोपाळपुरास रवाना होईल. श्रीकृष्ण मंदिरातून पूजा, आरतीनंतर श्रींचे रथोत्सवास सुरुवात होणार आहे. दरम्यान, मंदिरात हभप हरिभाऊ बडवे यांच्या वतीने कीर्तन सेवा, नगरप्रदक्षिणा करून श्रींचे रथोत्सवातील पालखीचे मंदिरात आगमन होणार आहे. मंदिर प्रदक्षिणेनंतर धुपारती होणार आहे. तर रात्री 9 ते 11 वीणा मंडपात हभप केंदूरकर महाराज यांच्या वतीने कीर्तन, रात्री 11 ते 12 पासधारकांना खिरापत पूजा, प्रसाद वाटप होत आहे. यावेळी फडकरी, मानकरी,दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप श्रींच्या गाभाऱ्यात होणार आहे.

शिरापूर येथील बुधवंत शेतकरी कुटुंबास यंदा मान 
आळंदीतील कार्तिकी यात्रेत दर्शनबारीतील प्रथम वारकरी कुटुंब दर्शनार्थी म्हणून यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्‍यातील शिरापूर येथील शेतकरी तुकाराम बुधवंत व कौशल्या बुधवंत या दाम्पत्यास मिळाला. त्यांना प्रथम दर्शनासह “श्रीं’च्या गाभाऱ्यात देवदर्शन आणि सत्कार नारळ प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. बुधवंत दाम्पत्य म्हणाले, सुमारे सात तास प्रतीक्षेनंतर माउलींच्या प्रथम दर्शनाचा मान मिळाला. सध्या आमच्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे; मात्र मुले सुशिक्षित व मिळवती असल्याने काळजी करण्याचे कारण नाही. श्रींचे दर्शनाने जीवन सार्थकी लागल्याचे समाधान आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)