ज्ञानेश्‍वर कारखाना अध्यक्षांच्या गटातच ऊस गाळपाचा प्रश्‍न गंभीर

दहिगावने-शहरटाकळी गटात 60 टक्‍क ऊस गाळपाविना शिल्लक; शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात
भावीनिमगाव – ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील दहिगावने व शहरटाकळी गटात सर्वात जास्त ऊस क्षेत्र आहे. अध्यक्षांच्या हक्काच्या गटातच शिल्लक ऊस गाळपाचा गंभीर प्रश्न बनला आहे. शेतकी खात्याकडून जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनमधून केला जात आहे. दोन दिवसात शेवगाव तालुक्‍यातील शहरटाकळी गटाचे नियोजन करावे. ऊस तोडणीसाठी मजूर वाढविण्यात यावेत.अन्यथा ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादीला घरचा आहेर मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी आ. नरेंद्र घुले, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांचा हक्काचा बालेकिल्ला असलेल्या दहिगाव-ने, शहरटाकळी गटात चालू गळीत हंगामात नियोजनाचा बट्ट्याबोळ झालेला दिसून येतो. 2017/18 या गळीतास असणारा ऊस जास्त प्रमाणात शिल्लक आहे. या गटात कारखान्याच्या शेतकी विभागाकडून कुठल्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही. अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. गळीत हंगाम सुरू होताना कारखाना व्यवस्थित चालला नसल्याने प्रशासन मेटाकुटीस आले होते. एक महिन्यानंतर कारखाना सुरळीत सुरू झाला. कारखान्याचे अध्यक्ष घुले यांनी सुरुवातीलाच उसाचा दर जाहीर करून जिल्ह्यात आघाडी घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते. ज्ञानेश्‍वर कारखान्याचा ऊस तोडीचे दर वर्षी योग्य प्रकारे नियोजन करण्यात येत असल्याने दहिगावने व शहरटाकळी गटातील ऊस शक्‍यतो शिल्लक राहत नाही. मात्र चालू गळीत हंगामात या भागाकडे शेतकी विभागाने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितीज घुले हे देवटाकळी येथील जि. प. प्राथ.शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी घुले यांच्यापुढे उसाच्या प्रश्‍नासाठी शेतकऱ्यांनी घेराव घालून कारखाना शेतकी विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करून ऊस तोडणी नियोजनात लक्ष घालण्याची विनंती केली. सभापती घुले यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्‍त केली. कारखाना चालू होवून चार महिने झाले तरी या गटातील 25 टक्‍के उसाचे गाळप झाले नाही. चालू गळीत हंगामात ज्ञानेश्‍वर कारखान्याने कार्यक्षेत्रातील उसापेक्षा बाहेरील ऊस आणून गळीत करण्यातच धन्यता मानली असल्याचे दिसून येते. कारखाना कर्मचारी व ऊस तोडणी कर्मचाऱ्याकडून सर्रास ऊस तोडीसाठी पैशाची मागणी केली जात असल्याच्याही तक्रारी आहेत. पैसे देवूनही उसाला तोड मिळत नसल्याने शेतकरी हैराण झालेले दिसून येत आहे. दहिगाव-ने गटातील मठाचीवाडी, भाविनिमगाव, दहिगाव, शहरटाकळी गटातील देवटाकळी, ढोरसडे, अंत्रे, बक्तरपूर, भायगाव, शहरटाकळी ही गावे राजकीयदृष्ट्या घुले कुटुंबाला मानणारी गावे आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये घुले बंधू जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला मतदार मोठ्या मताधिक्‍यांनी निवडून देतात.
मागील विधानसभा निवडणुकीतही या दोन्ही गटाने मोठे मताधिक्‍य दिले होते. तरी कारखान्याकडून या भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे का दुर्लक्ष केले जाते, याबाबत शेतकरी वर्गातून चर्चा होताना दिसत आहे. या भागातील पत्रकारांनी शेतकी अधिकारी आहेर यांच्याशी संपर्क साधला असता यासंदर्भातील उत्तरे विसंगत दिली गेली. या गळीतास आपला ऊस जातो की नाही या विवंचनेत शेतकरी दिसत आहे. कारखाना अध्यक्ष, संचालक यांनी दोन्ही गटाचा तातडीने आढावा घेवून ऊस तोडणी मजूर, मशिनरी वाढवून दोन दिवसात नियोजन करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. व्यवस्थापन कमिटीने तातडीने नियोजन न केल्यास नाईलाजास्तव शेवगाव-नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून घरचा आहेर द्यावा लागेल, असा इशारा घुले समर्थाकामधून दिला गेल्याने घुले कुटुंब या गटाचे कशाप्रकारचे नियोजन करतात याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.

चौकट….
ढिसाळ नियोजन शेतकऱ्यांची चिंता वाढविणारे
दहिगाव-ने (ता.शेवगाव) येथील एका पदाधिकाऱ्यांच्या उसाची फेब्रुवारीमधील नोंद असताना मधेच ऊसतोड देण्यात आल्याने कारखाना कर्मचाऱ्याचा मनमानी कारभार दिसून येतो. नियोजनाचा सावळा गोंधळ झाला असल्याचे मानले जाते. शेतकऱ्यांना सापत्न वागणूक देणाऱ्या येथील एका कर्मचाऱ्याची बदली करण्यासाठी शेतकी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांनी घेराव घातला होता. मात्र अद्याप या कर्मचाऱ्याची बदली न केल्याने आंधळ दळतंय अन्‌ कुत्र पीठ खातय, अशी अवस्था या कारखान्याची झाल्याचे दिसून येत. कारखान्याचे ढिसाळ नियोजन मात्र शेतकऱ्यांना चिंतेत टाकत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)