ज्ञानाच्या सर्व क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देण्यासाठी कटिबद्ध व्हा : डॉ. के कस्तुरीरंगन

स्वारातीम विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ

इस्त्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. के कस्तुरीरंगन यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नांदेड : विकास आणि वृद्धीच्या निर्णायक टप्प्यावर देश उभा आहे. तुमच्या पुढे आव्हाने आहेत. तथा संधी देखील आहेत. सातत्यपूर्ण शिक्षणातून स्वत:ला अद्यावत ठेऊन ज्ञानाच्या सर्व क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देण्यासाठी कटिबद्ध व्हा असे आवाहन  भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्त्रो) चे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा एकविसावा दीक्षान्त समारंभ आज मंगळवार, दि.२६ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले हे होते. यावेळी मंचावर अधिष्ठाता डॉ. वामनराव जाधव, प्राचार्य डॉ.व्ही.के. भोसले, प्राचार्य डॉ.जे.एम. बिसेन, डॉ.वैजयंता पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य परमेश्वर हसबे, डॉ.माधव पाटील,डॉ.सुर्यकुमार सदावर्ते, डॉ.दीपक बच्चेवार, डॉ.अशोक टीपरसे, गोविंदराव घार, डॉ.महेश मगर, गजानन असोलेकर, डॉ.रमाकांत घाडगे, कुलसचिव डॉ.रमजान मुलाणी, वित्त व लेखाधिकारी डॉ.गोविंद कतलाकुटे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या दीक्षान्त भाषणाच्या प्रारंभी डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी सुवर्णपदक विजेत्यांमध्ये विद्यार्थिनींच्या असणाऱ्या लक्षणीय संख्येबद्दल आनंद व्यक्त केला. नांदेडच्या प्राचीन ज्ञानवैभवाचा देखील त्यांनी गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला. येणाऱ्या काळात उदार शिक्षण (लिबरल एज्युकेशन) महत्त्वाचे ठरणार आहे, असे सांगून उदार शिक्षण हे व्यक्तीमध्ये गांभीर्याने व स्वतंत्रपणे विचार करण्याच्या स्वातंत्र्याचा विकास करते. पूर्वगृह, अंधश्रद्धा यापासून हे शिक्षण मुक्त करते. हे शिक्षण व्यक्तीला जीवनभरासाठी विचार करणारा नगरीक बनविते. ते म्हणाले की, अणुशक्ती, अवकाश, सरंक्षण आणि उद्योग या क्षेत्रात आपल्या देशाने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. तथापी आरोग्य, पिण्याचे पाणी, गुणवत्ता पूर्ण शिक्षण, पर्यावरण, संशोधन या क्षेत्रातील समस्या मात्र तशाच आहेत. त्या देखील प्राधान्याने सोडविण्याची आवश्यकता आहे. यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि परवडणारे शोध लावण्याची गरज आहे.

कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी आपल्या भाषणात वर्षभरात विद्यापीठाने केलेल्या वाटचालीचा आढावा मांडला. विद्यापीठ परिक्षेत्रातील औंढा येथे राष्ट्रीय सहभागासह अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने खगोलशास्त्राशी संबंधित अतिप्रगत अशी गुरुत्वीय तरंग शोध प्रयोगशाळा (लिगो) उभारण्याचे काम सुरु झाले असून या प्रयोगशाळेच्या उभारणीत विद्यापीठाचा महत्त्वाचा सहभाग राहणार आहे. किनवट येथील आदिवासी संशोधन व अभ्यासकेंद्रात पुढील शैक्षणिक वर्षापासून ‘ट्रायबल स्टडीज व सोशल वर्क’ हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे, असे सांगून विद्यापीठ हे आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असून यानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. तीन आंतरराष्ट्रीय परिषदा, क्रीडा महोत्सव, संस्कृतिक महोत्सव, व्याख्याने असे कार्यक्रम या निमित्ताने घेतले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रारंभी दीक्षान्त मिरवणुकीने मान्यवरांचे दीक्षान्त मंचावर आगमन झाले. विद्यापीठ गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. कुलगुरू आणि प्रमुख अतिथी यांच्या हस्ते पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी दीपप्रज्वलन करण्यात आले.

कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तर दीक्षान्त समारंभाच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रमाणपत्र कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, कुलसचिव डॉ.रमजान मुलाणी, वित्त व लेखाधिकारी डॉ.गोविंद कतलाकुटे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.रवि सरोदे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि विद्या परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत २७६ विद्यार्थ्यांना पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आले.

समारंभाचे सूत्रसंचालन डॉ.माधुरी देशपांडे आणि डॉ.पृथ्वीराज तौर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी अधिसभा सदस्य, विद्यापारीषद सदस्य, शिक्षण, सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह संकुलाचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार, तसेच विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)