ज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी व्हावा – डॉ. शाळिग्राम

पिंपरी – विद्यार्थ्यांनी पदवी मिळविण्यासाठी प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग मानव कल्याणासाठी होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवस नवी आव्हाने घेऊन आल्यास त्यांना धैर्याने सामोरे जाण्याची आवश्‍यकता आहे. उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी करताना आपल्या देशाचा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जपत ज्ञानाचा पुरेपुर वापर करुन मानवता जपा, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान, तंत्रज्ञान विभागाचे आधिष्ठाता डॉ. अरविंद शाळीग्राम यांनी केले.

आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ संपन्न झाला. यावेळी, क्‍वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतिश काळोखे, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, व्ही.एस. काळभोर, शांताराम गराडे, भाईजान काझी, हर्षवर्धन पाटील, डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ.ए. एम.फुलंबरकर, प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, प्रा. डॉ. शितलकुमार रवंदळे, पदवी प्राप्त विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या प्रसंगी ऐश्वर्या निकम, हेतार्थ चोकसी, चेतन स्वकुंडे, सौरभ बेदमुथा, राज गांधी, स्वजय श्रीनाथ, साक्षी जगताप, अथर्व ठाकरे, सौरभ ढवळे या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

शाळीग्राम म्हणाले, गेल्या तीस वर्षांच्या काळामध्ये विज्ञान-तंत्रज्ञानात मोठी क्रांती घडली. यानंतरच्या काळात तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन संशोधन होणार असून त्याचा वापर दैनंदिन जीवनात होईल. याचबरोबर, देशामध्ये स्मार्ट सिटी तयार होत असून या शहरांमध्ये सार्वजनिक आणि दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जाईल.

काळोखे म्हणाले, अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये गेल्या 40 वर्षांत अमूलाग्र बदल झाला आहे. ज्ञानाचा संचय करणे ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहिले पाहिजे. आपल्या क्षेत्रामध्ये कार्य करताना दररोज सर्वोत्तम काम करण्यावर भर दिला पाहिजे. प्रा. एस. बी. माटेकर व प्रा. दिप्ती खुर्गे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील ताडे यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)