#ज्ञानसंवर्धन: भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे बदलले क्रमांक 

चकोर माने 
काही दिवसांपूर्वीच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. त्यांनी भारताला दिलेला एक मोठा प्रकल्प म्हणजे रस्त्यांचे विस्तृत जाळे निर्माण करून राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण करणे. “पंतप्रधानांच्या स्वप्नातील सुवर्ण चतुष्कोन’ अर्थात “गोल्डन्‌ क्वाड्रीलॅटरल’ प्रकल्प. या प्रकल्पात देशातील चार मेट्रोज अर्थात सर्वाधिक आर्थिक उलाढाल असलेली शहरे चौपदरीकरणाद्वारे जोडण्यात आली. दिल्ली-कोलकता-चेन्नई-मुंबई ही ती चार शहरे. या संपूर्ण रस्त्यांची लांबी 5846 किमी भरते.
दिल्ली – कोलकाता – 1453 किमी प कोलकाता – चेन्नई – 1046 किमी
चेन्नई-मुंबई – 1290 किमी प मुंबई-दिल्ली – 1419 किमी असे हे विभाजन होते. या सर्व राष्ट्रीय महामार्गांना यापूर्वी जे क्रमांक देण्यात आले होते, ते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने सन 2017 मध्ये बदलले असून त्यासाठी संबंधित मंत्रालयातर्फे एक नोटीफिकेशन प्रसिद्ध केले होते. त्यानुसार ज्या मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापूर-बेंगळुरू या महामार्गाला आपण राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 असे म्हणत होतो, तो क्रमांक आता बदलण्यात आला आहे. आता हा रस्ता अधिक व्यापक करण्यात आला असून, तो दिल्ली-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 असा झाला आहे. याची एकूण लांबी आता 2807 किमी आहे. तसेच याच रस्त्याचा काही भाग आशियाई महामार्ग क्र. 43 यातही समाविष्ट आहे. हा आशियाई महामार्ग ग्वाल्हेर ते बेंगळुरू असा 2057 किमी अंतराचा आहे. आता राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 हा रस्ता अंदमान बेटावरचा मायाबंदर-पोर्टब्लेअर-चिडियाटापू असा 230 किमीचा रस्ता आहे.
आता राष्ट्रीय महामार्गांविषयी… 
राष्ट्रीय महामार्ग क्र. 1 हा आता उरी ते लेह या 535 किमीचा प्रदेश आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 2 हा दिब्रुगड ते तुईपांग असा 1214 किमीचा रस्ता आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 हा अतारी ते मनाली जोडणारा 265 किमीचा रस्ता आहे.
सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 – श्रीनगर ते कन्याकुमारी 3745 किमी
सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग क्र. 79 – सालेम ते उलुंडरपेट्टी 137 किमी
एक हजार किमीपेक्षा जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग असे आहेत… 
क्रमांक 6 – जोरबाट ते ऐज्वाल – 1873 किमी प क्रमांक 13 – तवांग ते पासिघाट – 1150 किमी प क्रमांक 27 – पोरबंदर ते सिल्चर – 3507 किमी प क्रमांक 30 – सितारगंज ते कोडापल्ले – 2010 किमी प क्रमांक 34 – गंगोत्रीधाम ते जबलपूर – 1426 किमी प क्रमांक 47 – बामनबोर गुजरात ते नागपूर – 1080 किमी प क्रमांक 52 – संगरुर ते अंकोला – 2317 किमी प क्रमांक 53 – हाजीरा-सुरत ते पारादीप – 1781 किमी
क्रमांक 66 – पनवेल-महाड ते कन्याकुमारी – 1593 किमी
माईलस्टेनचे रंग आणि रस्त्याचे वर्गीकरण 
पिवळा दगड – जर तुम्हाला रस्त्याच्या कडेला पिवळ्या रंगाचे मैलाचे दगड दिसत असतील तर तुम्ही राष्ट्रीय महामार्गवरून प्रवास करताय असं समजा. हे रस्ते एका प्रदेशाला दुसऱ्या प्रदेशाशी जोडतात. या महामार्गांची निर्मीती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केली जाते.
हिरवा दगड – रस्त्याच्या कडेला जर हिरव्या रंगाने रंगवलेले मैलाचे दगड असतील तर तो रस्ता राज्य महामार्ग आहे असं समजा. हे महामार्ग दोन मोठ्या शहरांना अथवा जिल्ह्याच्या ठिकाणांना जोडण्याचे काम करतात. या राज्यमार्गांची निर्मिती राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाते.
नारंगी रंगाचे दगड – ज्या रस्त्यांच्या कडेला नारंगी रंगाने रंगवलेले मैलाचे दगड असतील ते रस्ते नॅशनल किंवा स्टेट हायवेला गावांशी जोडण्याचे काम करतात. या रस्त्यांना पंतप्रधान ग्राम सडक योजनेमार्फत बनवलं जातं.
काळ्या-निळ्या रंगाचे दगड – काळ्या किंवा निळ्या रंगाने रंगवलेले मैलाचे दगड हे शहर किंवा गावाच्या सीमेजवळ असतात. रस्त्यावरील या दगडांना पाहून तुम्ही समजू शकता की एखादं शहर जवळ येत आहे. यांची निर्मिती त्या स्थानिक प्रशासनाकडून केलेली असते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)