जो गरजते है, वो बरसते नही

आ. गोरेंचा विरोधकांवर हल्लाबोल : पाण्याच्या नावाखाली खिसे भरणाऱ्यांना जनता अद्दल घडवेल

खटाव, दि. 1 (प्रतिनिधी) – माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या आणि जीवापाड प्रेम करणाऱ्या माण-खटावच्या जनतेची सेवा करण्यासाठी मी रात्रंदिवस परिश्रम करतो. विरोधक, मात्र जातीपातीचे राजकारण करुन भांडणे लावण्याचे उद्योग करत आहेत. उरमोडीचे पाणी माझ्याच कार्यकाळात आणि मीच आणले आहे, हा इतिहास कुणीच बदलू शकत नाही. त्यामुळे पाण्याच्या नावाखाली गोरगरिब शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन खिसे भरणाऱ्यांना आगामी काळात जनता आणखी मोठी अद्दल घडवेल, असा विश्वास आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. म्हसवडच्या सभेत माझ्याविरोधात बरळणाऱ्यांनी “जो गरजते है, वो बरसते नही’ हे ध्यानात ठेवावे असा इशाराही त्यांनी दिला.
धनाजीराजेनगर (म्हसवड) येथे उरमोडीच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, डॉ. वसंतराव मासाळ, नगरसेवक अकिल काझी, सरपंच उद्धव काटकर, संजय जगताप, जालिंदर बाबर, शंकर बाबर, काकासाहेब माने, मल्हारी जाधव, दत्तात्रय शिर्के आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. गोरे म्हणाले, उरमोडीचे पाणी आल्याने माताभगिनी, युवक आणि शेतकऱ्यांनच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारी माझ्यावर जीवापाड करणारी जनताच माझी मिळकत आहे. तीन वर्षापूर्वी म्हसवडमध्ये पाणी आणले होते. तेंव्हापासून लागेल तेव्हा पाणी आणतोय. मात्र जयकुमारला श्रेय मिळू नये, म्हणून काही लफंग्यांनी विनाकारण आंदोलनाचे नाटक केले. ज्यांनी माझ्याशी बेईमानी केली त्यांना आता रिकामटेकडे बसण्याशिवाय गत्यंतर नाही. अनेक वर्षे या भागातील जनतेचा फक्त स्वार्थासाठी वापर करुन राजकारण करणाऱ्यांनी इथे विकासकामे मात्र कोणतीच केली नाहीत. विरोधकांना स्पर्धाच करायची असेल तर जयकुमारने म्हसवड परिसर, माण आणि खटाव तालुक्‍यात केलेल्या विकासकामांशी स्पर्धा करा. शब्द दिल्याप्रमाणे मी माझ्या मतदारसंघाची परिस्थिती बदलून दाखवली आहे. सरकार कुणाचेही असो, उरमोडीचे पाणी माझ्याच कालखंडात आणि मीच आणले आहे, हा इतिहास कुणीच बदलू शकत नाही. त्यामुळे संतूलन बिघडलेल्यांना उठता-बसता आणि स्वप्नात फक्त जयकुमारच दिसत आहे.
आ. गोरे म्हणाले, विरोधकांनी जीवाभावाची माणसे त्यांना का सोडून गेली याचा विचार करावा. आता बंधाऱ्यात आलेले पाणी फळ्या काढून खाली सोडण्याचे मनसूबे काही महाभागांनी रचले आहेत. मी राजेवाडी तलाव, हिंगणी, पळसावडे, देवापूरला पुरेसे पाणी मिळाल्याशिवाय सुरु असलेले पाणी बंद होवू देणार नाही. उरमोडीचे पाणी शेतकऱ्यांना विनामोबदला मिळावे, म्हणून माझे प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांनी चुकीच्या लोकांच्या नादी लागू नये. विरोधक कोणतेच काम करत नाहीत. फक्त जातीपातीचे राजकारण करुन भांडणे लावायचे उद्योग करत आहेत. पाणी देण्याच्या नावाखाली गोरगरीब शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन खिसे भरणाऱ्यांना आता या भागात थारा देवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
नितीन दोशी, संजय जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना निष्क्रिय विरोधकांचे वाभाडे काढले. सूत्रसंचालन डीएम अब्दागिरे यांनी केले .

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)