जॉर्ज फर्नांडिस यांचे साताऱ्याशी होते वेगळेच ऋणानुबंध

एक आठवण : मुकुंद फडके
संरक्षण मंत्री असतानाही सातारा दौऱ्यात झाले साधेपणाचे दर्शन

सातारा – देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि ज्येष्ठ कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे वृध्दापकाळाने निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. आपल्या कारकिर्दीत देशात सर्वत्र झंजावती दौरे करणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांचे साताऱ्याशी वेगळे ऋणानुबंध होते.आपल्या कारकिर्दीच्या पुर्वार्धात एक साधा कामगार नेता असताना आणि नंतर संरक्षण मंत्री झाल्यावरही सातारा दौऱ्यावर आलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांच्या साधेपणाचेच दर्शन सातारकरांना झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि कामगार चळवळीशी संबंधित सुरेश साधले यांना जॉर्ज फर्नांडिस यांचा सहवास लाभला होता.त्यांनी सातारा आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे ऋणानुबंध आपल्या आठवणीतून उलगडले.रजताद्रि हॉटेलचे सर्वेसर्वा शामण्णा शानभाग यांच्याशी जॉर्ज फर्नांडिस यांची जिव्हाळ्याची मैत्री होती आणि ती त्यांनी शेवटपर्यंत जपली होती. सातारा येथील एसटी कामगार भवनाचे उद्‌घाटन जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते 4 ऑक्‍टोबर 1998 रोजी झाले होते. त्यावेळी ते संरक्षणमंत्री होते. पण हा दौरा खाजगी असल्याने त्यांनी सर्व सरकारी यंत्रणा आणि संरक्षणही नाकारली होते आणि खाजगी वाहनाने प्रवास केला होता,अशी आठवण साधले सांगतात.

जॉर्ज फर्नांडिस यांच्या पर्यावरण बांधिलकीची आठवणही साधले सांगतात.या दौऱ्यानंतर जॉर्ज फर्नांडिस यांना पुणे येथे जायचे होते. त्यासाठीही खासगी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होते. एसटीचे दोन कामगार त्यांच्या समवेत होते. शिरवळ येथे जॉर्ज फर्नांडिस यांनी सिताफळे विकत घेतली आणि ती खाउन झाल्यावर त्याच्या बिया कागदात बांधुन घेतल्या.गाडी घाटातून जात असताना त्यांनी या बिया दोनही बाजुला फेकल्या.

कामगार नेते असतानाही जॉर्ज फर्नांडिस अनेकवेळा सातारा दौऱ्यावर आले होते.तेव्हाही त्यांच्यातील साधेपणाचे दर्शन घडले होते.सातारा बसस्थानकावरील झुणका भाकरी हाच त्यांचा आहार असायचा.बहुतेक वेळा चालतच आणि क्वचितच ते रिक्षाने प्रवास करीत.एसटीच्या गेस्ट हाउसमध्येच त्यांचा मुक्काम असायचा अशी माहितीही साधले यांनी दिली.

 

शबनम हेच सामान

एक लोकप्रिय नेता असतानाही जॉर्ज फर्नांडिस यांनी कधी बडेजाव मिरवला नाही.खांद्याला एक शबनम पिशवी,या पिशवीत जरुरीपुरते कपडे आणि एखादे पुस्तक एवढेच सामान असायचे.कधी बसस्थानक तर कधी सरकारी गेस्ट हाउस याठिकाणी त्यांचा मुक्काम असायचा.आपल्या प्रत्येक कृतीतून जॉर्ज फर्नांडिस यांच्या साधेपणाचे दर्शन घडायचे अशी माहितीही सुरेश साधले यांनी दिली.

चांदीचा रथ नाकारला

जॉर्ज फर्नांडिस यांच्या प्रमुख उपस्थितीत साताऱ्यात कामगार मेळावा झाला होता.या मेळाव्यात कामगारांनी त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते.यावेळी कामगारांतर्फे त्यांना चांदीचा रथ देण्यात येणार होता.पण जॉर्ज फर्नांडिस यांनी हा रथ स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि खादीचा शर्ट आणि लेंग्याचे कापड याची मागणी केली.ही साधी भेट घेउनच त्यांनी हा सत्कार स्वीकारला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)