जॉगिंग

प्राची पाठक

जॉगिंग ट्रॅकवर रोज चालायला जायचं. एक फेरी मारायची. आधी थोडं हळू जायचं. मग वेग वाढवायचा. मग ब्रिस्क वॉक करायचा. मग फेरी पूर्ण होते एक किलोमीटरची. मग दुसरी फेरी मारायची. मग अजून वेग वाढवायचा. थोडे पळायचे. मग दुसरी फेरी पूर्ण होते. मग तिसरी. आता वेग कमी जास्त करायचा नाही. चालत राहायचं. चालत राहायचं. चालत राहायचं. मग अजून एक दोन फेऱ्या होतात. मग वेग कमी करायचा. हळू चालायचे. त्यात अर्धी अधिक फेरी होते. मग नेहमीसारखे रमतगमत चालत, फेऱ्यांवर फेऱ्या मोजून घरी परत यायचे. जमले, तर परत संध्याकाळी हेच करायचे. असे रोज करायचे आणि असे वर्षानुवर्षे करायचे. फेऱ्या मोजत राहायच्या. चालत राहायचे.

पाटीत फावड्याने वाळू ओढायची. चार फावडी वाळू भरायची. एक श्वास घ्यायचा, वाळू उचलायची. एका हाताने डोक्‍यावरची चुंबळ नीट करायची. दुसऱ्या हातावर पाटीचा तोल सांभाळायचा. पाटी डोक्‍यावर ठेवली की त्या तिकडे जाऊन पाटी ओतायची. रिकामी पाटी परत आणायची, परत फावड्याने वाळू ओढायची. चार फावडी वाळू भरायची. एक श्वास घ्यायचा, वाळू उचलायची. एका हाताने डोक्‍यावरची चुंबळ नीट करायची, दुसऱ्या हातावर पाटीचा तोल सांभाळायचा. पाटी डोक्‍यावर ठेवली की हाकेच्या अंतरावर जाऊन पाटी ओतायची. असं दिवसभर करायचं आणि असंच वर्षानुवर्षं करायचं.

पाटीवर पाटी वाहून नेतांना नेमक्‍या किती पाट्या टाकल्या ते कधी मोजलेले नसते. पण जॉगिंग ट्रॅकवर अगदी एकेक पाऊल देखील मोजावेसे वाटते. पाटी वाहून नेल्याने दिवसाच्या शेवटी पैसे मिळतात. जॉगिंग ट्रॅकवर चालायला पैसे लागत नाहीत. पण मिळालेल्या, मिळत असणाऱ्या किंवा न मिळालेल्या पैशांमुळे तिथे अधिकाधिक चालायची आणि प्रसंगी पैसे देऊन पण चालायला जायची वेळ येऊ शकते! एकेकदा असा ट्रॅक घरातच आणून ठेवावा लागतो, चालण्यासाठी. पाटीवर पाटी रोजच टाकणाऱ्या व्यक्तीला उगाचच रोज चालून चालून दमणारे लोक नेमके कसे वाटत असावेत, ह्याचे मला रोजच कुतूहल असते. जॉगिंग ट्रॅकच्या बाजूलाच मोठ्ठे बांधकाम सुरू आहे ना! ट्रॅकवर चालणाऱ्या माणसाच्या मनात पाटीवर पाटी टाकायची वेळ ज्याच्यावर येते, त्याच्याबद्दल काय वाटत असणार, ते मात्र बरेचसे अंदाज बांधून समजू शकते. पहिल्या प्रकारच्या वाटण्यात कल्पनेच्या भराऱ्या मारायची अगाध शक्‍यता आहे!

खाल्लेले पचवायला जॉगिंग करावे लागते, तर खायला मिळविण्यासाठी पाटीवर पाटी टाकावी लागते! भाराशीच दोघांचा संबंध असला तरी सुद्धा यात कोणीही एक जास्त भारी नाही की दुसरा कुणी कमी भारी नाही. तरीही ते भारवाहकच आहेत!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)