“जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते मजला हवे” (प्रभात..open house)

१९४७ साली, १४ ऑगस्टच्या मध्यरात्री  नेहरूंनी “नियतीशी करार” केला. या १५ ऑगस्टला त्या घटनेला ७२ वर्ष पूर्ण होतील. एकाहत्तर वर्षानंतर हा देश कसा आहे?  तर याच देशात मंगळयान सारखी मोहीम यशस्वी होते आणि याच देशात ऑक्सिजनच्या अभावामुळे ६० लहान मुलं मृत्युमुखी पडतात. हा विरोधाभास हे आपल्या ७१ वर्षांच्या प्रवासाचं वैशिष्टय आहे.

आमचं समाजजीवन हे अशा विरोधाभासांचे जिवंत उदाहरण आहे. ए . राजाने २ जी घोटाळा केला म्हणून त्याला नाव ठेवणारे आपण ट्राफिक पोलिसांच्या हातात सहजपणे शंभराची नोट सरकावतो. स्विस बँकेतल्या काळ्या पैशाचा निषेध करताना , जमिनीच्या व्यवहारात टॅक्स बुडवण्यासाठी बिनदिक्कत रोखीने पैसे देतो. काळजीची गोष्ट अशी आहे की, हा विरोधाभास आम्हाला दिसत नाही, किंवा सोयीस्करपणे आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. आम्ही आमच्या देशाला महान, परफेक्ट म्हणत राहतो. या देशातल्या व्यंगावर, विरोधाभासावर कोणी बोट ठेवलं कि ते आम्हाला सहन होत नाही. मला वाटतं , भारतीय म्हणून आम्ही स्वतःचेच दोष मान्य करायला कचरतो आणि तिथेच चुकतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सत्तर वर्षांत समाजाच्या सर्व अंगांमध्यें आम्ही जी काही थोडीफार प्रगती केलेली आहे ती “चुका, आणि त्यातून शिका ” या तत्त्वातून झालेली आहे. टॉलस्टोयने एका ठिकाणी म्हटलंय,”आपल्या जीवनाचा आर्थिक आणि सामाजिक दर्जा सुधारत नेणं हे कुठल्याही मानवी संस्कृतीचं ध्येय असतं “. गेल्या सत्तर वर्षांत भारतीय समाजाने धीम्या गतीने का होईना हे प्रयत्न केले आहेत हे आपण मान्य केलंच पाहिजे. मुळात सुधारणा तेव्हाच होते जेव्हा सुधारणेची गरज आहे हे संबंधितांना पटलेलं असतं. त्यासाठी स्वतःतले दोष स्वीकारण्याची आणि योग्य,उत्तम काय आहे हे समजून घेणारी निकोप दृष्टी लागते. एक समाज म्हणून आपण यात कमी पडतोय असं मला वाटतं. अर्थातच हि एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. देश म्हणून, भारतीय म्हणून प्रगल्भता येण्याची हि प्रक्रिया आमच्याकडे अधिकाधिक लोकांनी आत्मसात करावी असं मला वाटतं. मग आपोआपच सगळ्याच क्षेत्रात आमची पावलं “परफेक्ट”होण्याकडे पडतील. “जे जे उत्तम, उदात्त, उन्नत मजला हवे” म्हणण्याची वृत्ती आमच्यात यावी हीच स्वातंत्र्यदेवीच्या चरणी प्रार्थना.

अभिषेक राउत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)