जेव्हा कचऱ्याचे “सोने’ होते…!

पिंपरी – कचरा शहरांसाठी डोकेदुखी ठरत असताना घरच्या घरी अथवा सोसायट्यांमध्ये कचरा जिरवून इंधन, खत, वीज तयार करुन “कचऱ्याचे सोने’ कसे करायचे याचे दर्शन चिंचवड येथे आयोजित घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाच्या माध्यमातून पहायला मिळत आहे. तीन दिवसीय प्रदर्शनाला शुक्रवारपासून (दि. 17) सुरुवात झाली.

पिंपरी-चिंचवड महापालिका व युनीट्रॅक सोल्युशन्स प्रा. लि. यांच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर सभागृहात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या 50 कंपन्या, संस्था सहभागी झाल्या आहेत. कचरा व्यवस्थापन, तंत्रज्ञानाविषयी जागरुकता वाढवणे आणि नागरिक, व्यावसायिक, मोठ्या सोसायट्या यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करणे आणि त्याचा पुर्नवापर कसा करावा याबाबतची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून दिली जात आहे. घरात दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे जैविक खतात कसे रुपांतर करावे याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जात आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी, नागरिक, व्यापारी संस्था, गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था तसेच बचतगटांनी गर्दी केली होती. 19 ऑगस्ट अखेर हे प्रदर्शन सुरु राहणार आहे.

-Ads-

मुंबईतील आरयुआर ग्रीन लाईफ या संस्थेने कचऱ्यातील कागदांपासून तयार केलेल्या विविध वस्तूंचे सादरीकरण केले आहे. कागदी कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्यापासून पेन्सिल, वह्या, पेन स्टॅंड, फ्रेम, विविध भेटवस्तू तयार केल्या आहेत. डेली डंप या संस्थेने मातीच्या आकर्षक भांड्यांची उतरंड रचून त्यात ओला कचरा टाकून त्यातून खत निर्मितीचा अनोखा प्रकल्प प्रदर्शनात सादर केला आहे. हा प्रकल्प मेटेनन्स फ्री असल्याची माहिती डेली डंप संस्थेच्या प्रज्ञा आलाटे यांनी दिली. प्रदर्शनामध्ये विश्‍वदीप प्रेसपार्ट प्रा. लि. यांचा कचऱ्यापासून हरीत उर्जा निर्मितीचा प्रकल्प लक्षवेधी ठरला आहे. कचरा टाकण्याची एक टाकी आणि गॅस साठवण्याचा फुगा याच्या मदतीने स्वयंपाकाचा गॅस निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान नागरिकांना आचंबित करत आहे.

प्लॅस्टिकला पर्याय मक्‍याची पिशवी
प्लॅस्टिक बंदीमुळे व्यावसायिकांपासून ते ग्राहकांपर्यंत साऱ्यांचीच गैरसोय होत आहे. प्लॅस्टिकला पर्याय म्हणून बेंगलोर येथील प्लास्टो मॅन्युफॅक्‍चरिंग कंपनीने मक्‍याच्या कणसापासून प्लॅस्टिकसारखी दिसणारी पिशवी तयार केली आहे. देशभरात या कंपनीकडून प्लॅस्टिक पिशव्यांचा पुरवठा केला जातो. महाराष्ट्र राज्यातील प्लॅस्टिक बंदीनंतर येथूनही या पिशव्यांना मागणी वाढल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पी. एम. मोहम्मद अशपाक यांनी दिली. संजीवनी ओला कचरा जिरवणारी पिशवी प्रदर्शनातील कुतुहलाचा विषय ठरला आहे. या पिशवीमध्ये किचन वेस्ट टाकून त्यापासून कंपोस्ट खत तयार होते, अशी माहिती जीपीएसई एन्व्हायरोमेंटल सोल्युशन्स कंपनीचे राजेंद्र लडकत यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)