जेडीयूचे खासदार अन्सारी संसदीय पक्षातून निलंबित

विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल कारवाई

नवी दिल्ली -बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूने आज खासदार अली अन्वर अन्सारी यांना संसदीय पक्षातून निलंबित केले. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.

बिहारमध्ये राजद आणि कॉंग्रेसबरोबरच्या महाआघाडीतून बाहेर पडत जेडीयूने त्या राज्यात सरकार स्थापनेसाठी भाजपशी युती केली. आता भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सत्तारूढ एनडीएचा घटक बनण्यास जेडीयू सज्ज झाला आहे. त्यामुळे अन्सारी यांची विरोधी पक्षांच्या बैठकीतील उपस्थिती जेडीयूला रूचली नाही. त्यांना जेडीयूच्या संसदीय पक्षातून निलंबित करण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते के.सी.त्यागी यांनी दिली.

जेडीयूच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न सोनिया करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, दुसऱ्यांदा राज्यसभा सदस्य बनलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ पुढील वर्षी एप्रिलमध्ये समाप्त होणार आहे. भाजपशी हातमिळवणी करण्याच्या जेडीयूच्या निर्णयावर अन्सारी यांनी आधीच जाहीर टीकास्त्र सोडले होते. आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून जेडीयूने पक्षातील नाराजांना थेट संदेश दिल्याचे मानले जात आहे. मात्र, या कारवाईमुळे जेडीयूमधील मतभेद उफाळण्याची चिन्हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)