“जेट पॅचर’मधून आता “थेट लूट’?

पिंपरी – पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यातील खड्‌डे नवीन नाहीत. संबंधित खड्डे बजुवण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र, तरीही महापालिका प्रशासन केवळ पावसाळ्यात निर्माण होणारे खड्डे बजुवण्यासाठी नवीन व्यवस्था करण्याच्या मन:स्थितीत आहे. त्यासाठी सुमारे 8 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासन “जेट पॅचर’मधून सर्वसामान्य नागरिकांच्या कररुपी पैशाची “थेट लूट’ करणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

वास्तविक, एखाद्या ठेकेदाराने रस्ता तयार केला असता, त्यावर खड्डे पडल्यास सुमारे एक वर्षभर त्याची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. तसेच, एखाद्या कंपनीने रस्त्याची त्यांच्या कामासाठी खोदाई केल्यास त्याबाबत महापालिका संबंधित कंपनीकडून दुरुस्तीचा खर्चही जमा करुन घेते. मात्र, तरीही पावसाळ्यात दरवर्षी पडणारे खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेने “जेट पॅचर मशीन’चे सुमारे आठ कोटी रुपयांचे काम काढले आहे. परंतु, या कामाची निविदाप्रक्रिया व स्थायी समिती समोरील प्रस्ताव बघता हे काम संशयाच्या फे-यात आहे. एकीकडे रस्त्यांसाठी दुहेरी खर्च करण्याचा उद्योग पालिका स्थापत्य विभागाने चालवला आहे. तर, दुसरीकडे शहरासाठीचे हे काम इ-प्रभागातून का काढण्यात आले? असा प्रश्न आहे.

प्रशासन आता नवीन “जेट पॅचर पोथॉल पॅचिंग मशिन’ द्वारे पावसाळ्यात खड्डे बुजवणार आहे. या कामासाठी पालिकेच्या इ-प्रभागाकडून 23 ऑक्‍टोबर ते 20 नोव्हेंबर 2017 या कालावाधीत निविदाप्रक्रिया राबविण्यात आली. परंतु, त्याची निविदा रक्कम अधिका-यांनी निश्‍चित केली नाही. तर, प्रथमच “बी-2′ ही वेगळी पध्दत या कामाससाठी अंवलंबविण्यात आली. त्यानुसार ठेकेदारांनी दर निश्‍चिती करून निविदा भरायची होती. त्यानुसार मे. अताशा आशिर्वाद बिल्डर ठेकेदाराने 9 कोटी 3 लाख 29 हजार 128 रुपये, एसटीजी इन्फ्रा प्रा. लि. ठेकेदाराने 9 कोटी 67 लाख, 7 हजार 870 रुपये आणि मे. अंजनी लॉजिस्टिक या ठेकेदाराने 8 कोटी 32 लाख 41 हजार 772 रुपये अशा तिन ठेकेदारांच्या तीन दराच्या निविदा प्राप्त झाल्या.

सर्वात कमी दराची निविदा मे. अंजनी लॉजिस्टिकची असल्याने त्यांना काम देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने ठेवला आहे. रस्त्यावर खड्ड्यांच्या नावाखाली हा कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. मात्र, त्यानंतर तरी शहरातील खड्ड्यांच्या त्रासापासून नागरिक मुक्त होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे रस्ते, डांबरीकरण करणा-या ठेकेदारांकडून दर्जेदार काम करून घेणे आणि खड्डे पडल्यास त्याला जबाबदार धरणे. याकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करत खर्चाचा नवा पायंडा पाडत आहेत.

निविदा प्रक्रियेचे गणित चुकले?
महापालिका प्रशासनाने या कामाची मुदत 36 महिने ठेवली आहे. परंतु, प्रत्यक्षात हा ठेकेदार पावसाळ्यातील चार महिने खड्डे बुजवण्यासाठी काम करणार आहे. एकूण काम 12 महिनेच होणार आहे. मात्र, 36 महिने मुदतीच्या नावाखाली मोठ्या रक्कमेचे काम काढण्याचा हा प्रकार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया वर्षातील 4 महिन्यांप्रमाणे काढणे आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)