जेजुरी नगरपरिषदेत मुख्याधिकारीच नाही

जेजुरी- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासह महाराष्ट्रातील वैष्णवांचा मेळा मंगळवारी (दि.20) पुरंदरच्या भूमीत प्रवेश करणार आहे. पालखी सोहळा व वारकऱ्यांच्या सोयीसुविधांच्या जय्यत तयारीसाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.सासवडचा दोन दिवसांचा मुक्काम आटोपून पालखी सोहळा गुरुवारी (दि.22) जेजुरीत मुक्कामी असणार आहे. मात्र, गेल्या 20 दिवसांपासून येथे कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नेमणूकच झालेली नाही. त्यामुळे अनेक निर्णय घेताना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.
नागरिकांच्या कामांसह विकासकामे व शासन दरबारी दाखल करावयचे विकासकामांचे प्रस्ताव खोळंबल्याचे चित्र आहे. जेजुरी नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती होण्यासाठी सर्वसामान्यांचा आवाज लोकप्रतिनिधी व शासन स्तरावर पोहोचवण्यासाठी आता कोणीतरी जेजुरी नगरपालिकेला मुख्याधिकारी द्या हो.., असा टाहो फोडण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
मुख्याधिकारी समीर भूमकर यांची आळंदी येथे 1 जूनला बदली झाली आहे. दि. 2 जूनला त्यांनी जेजुरी नगरपालिकेचा पदभार सोडला तेंव्हापासून जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी पद रिक्त आहे. किमान पालखी सोहळा पुरंदरमध्ये दाखल होण्यापूर्वी येथे मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती होईल, अशी नागरिकांची व लोकप्रतिनिधींची अपेक्षा होती. सध्या, सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याकडे जेजुरी नगरपालिकेचा तात्पुरता पदभार असून दोन्ही शहरे तीर्थक्षेत्राची असल्याने व त्यातच पालखी सोहळा पुरंदरमध्ये प्रवेश करीत असल्याने त्यांच्यावर कामाचा मोठा ताण पडत आहे. मागील काळात जेजुरी मुख्याधिकाऱ्यांची बदली झाली की, त्वरित येथे नव्याने दुसरे मुख्याधिकारी रुजू होत होते. यावेळी मात्र तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण करून येथील मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्या बदलीनंतर 20 दिवसांचा कालावधी लोटला तरी प्रशासनाच्या वरिष्ठ पातळीवरून कोणाही मुख्याधिकारी येथे आलेले नाहीत. यामुळे नव्याने कोण मुख्याधिकारी रुजू होणार..? हा प्रश्‍न गुलदस्त्यातच आहे आणि याची उत्सुकता नगरवासीयांसह स्थानिक लोकप्रीतीनिधींना आहे. गेली सात-आठ महिन्यांपासून गायब असलेले बांधकाम अभियंता प्र.प्र.घुमे हे आठवड्यापूर्वी नगरपालिकेत रुजू झाले आहेत. कामांचा ताण पडत असला तरी पालखी सोहळा पूर्व तयारीची कामे जेजुरी प्रशासनाने पूर्ण केली असल्याचे व पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जेजुरी नगरपालिका सज्ज असल्याचे प्रभारी मुख्याधिकारी जळक यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)