जेजुरी गडावर भाविकांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी

जेजुरी-तीर्थक्षेत्र जेजुरीतील खंडोबा गडावर देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी मार्तंड देवसंस्थानच्या वतीने सुमारे पाच लाख रुपये खर्चाचे एक हजार लिटर क्षमतेचे तीन वॉटर फिल्टर बसविण्यात आले आहेत. रविवारी (दि. 16) कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांचे हस्ते उद्‌घाटन करून ही यंत्रणा भाविकांच्या सोयीसाठी कार्यान्वित करण्यात आली.
गेली अनेक वर्षांपासून गडावर खंडेरायाच्या देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची शुद्ध पिण्याच्या पाण्याबाबत तक्रार होती. ऐन उन्हाळ्यात व जत्रा-यात्रा उत्सवांच्या वेळी जेजुरी गडावर देवदर्शनासाठी भाविकांची संख्या लक्षणीय असते. अशावेळी भाविकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्याने नाइलाजास्तव पाणी विक्रेत्यांकडून 20 ते 25 रुपये खर्चून पाण्याची बाटली विकत घ्यावी लागत असे. मागील महिन्यात पुणे विभागाचे सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी जेजुरी गडाला भेट देत विविध विकासकामांचा व भाविकांच्या सोईसुविधांचा आढावा घेत देवसंस्थान विश्वस्त यांच्या बरोबर चर्चा करीत प्राधान्याने भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धतता गडावर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने गडाच्या आवारामध्ये तीन ठिकाणी सुमारे पाच लाख रुपये खर्चाची वॉटर फिल्टर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. दर रविवारी आपल्या परिवारासह जेजुरीच्या खंडेरायाच्या देवदर्शनासाठी गडावर येणारे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते या सुविधेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख विश्वस्त ऍड. वसंत नाझीरकर, विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, माजी विश्वस्त सुनील असवलीकर, नगरसेवक गणेश शिंदे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र निंबाळकर, देवसंस्थान कर्मचारी -अधिकारी उपस्थित होते. तसेच पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी गडाच्या पायरीमार्गावर तीन ठिकाणी अशाच प्रकारची वॉटर फिल्टर यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असून या कामासाठी मुंबई येथील भाविक मदत करणार असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले तर भविष्यात देवसंस्थानला विविध विकासकामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगीतले. देवसंस्थानच्या उपक्रमाबाबत अनेक भाविकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)