जेजुरीत सोमवती यात्रा भरणार नाही

  • उगवत्या सूर्याला अमावस्येचा स्पर्श होत नसल्याने घेतला निर्णय

जेजुरी – या वर्षी जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा सोमवारी (दि. 8) आयोजित करण्यात येणार नसल्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवारी सकाळी 11 वाजून 32 मिनिटांनी अमावस्या सुरु होत असून मंगळवारी (दि. 9) सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी संपते. सोमवारी उगवत्या सूर्याला अमावस्येचा स्पर्श होत नसल्याने देवाचा पालखी सोहळा काढण्यात येणार नाही. त्यामुळे सोमवती यात्रा भरणार नाही.
सोमवती यात्रेच्या नियोजनासाठी जेजुरी येथील ऐतिहासिक छत्री मंदिरात पालखी सोहळ्याचे मानकरी, खांदेकरी व ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश आगलावे, प्रमुख मानकरी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, रमेश राउत, छबन कुदळे, अरुण खोमणे समवेत खंडोबा पालखी सोहळ्याचे खांदेकरी, बाराबलुतेदार अठरा अलुतेदार समाजाचे मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पंचांगात सोमवार व मंगळवारी अमावस्या दाखविण्यात आली आहे. तसेच बुधवारी प्रतिपदा असल्याने सोमवती यात्रा भरणार कि नाही याबाबत मोठी चर्चा ग्रामस्थामध्ये होती. यात्रेच्या आयोजनाबाबत सर्व पालखी सोहळ्याचे मानकरी खांदेकरी व ग्रामस्थामध्ये चर्चा करण्यात आली. पालखी सोहळ्याची मागील रूढी परंपरा, पहाटे सूर्याला अमावस्येचा स्पर्श होत नसल्याने तसेच रविवारी पालखीसाठी शेडा देता येत नसल्याने व घटस्थापना बुधवारी होत असल्याने पालखी सोहळा काढता येणार नाही असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर प्रमुख मानकरी राजेंद्र पेशवे यांनी सोमवारी सोमवती यात्रा भरणार नसल्याचे जाहीर केले.
या बैठकीत देवसंस्थानने घटना दुरुस्तीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात अर्ज केला असून सण, उत्सव गावाच्या परंपरा, मानकरी खांदेकरी यांचे हक्क कायम अबाधित ठेवावेत, तसेच ग्रामस्थांना विश्वासात घेवूनच घटना दुरुस्त करावी अशी मागणी केली आहे. खंडोबा देवाच्या घोड्यासाठी पागा बांधण्याचा अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित होता. गडाच्या पायथ्याशी कडेपठार रस्त्यालगत या पाग्यासाठी खंडोबाभक्त संतोष खोमणे यांनी पाच गुंठे जागा देणार असल्याचे या बैठकीत जाहीर केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)