जेजुरीत सामुदायिक विवाह सोहळा

मार्तंड देवसंस्थानतर्फे आयोजन, विश्‍वस्तांची पत्रकार परिषद

जेजुरी -तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत यंदाच्या वर्षांपासून सर्वधर्मीय बिगरहुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना राबविण्याचे श्री मार्तंड देवसंस्थान समितीने धोरण ठरवले असून येत्या 10मे रोजी जेजुरीत होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये इच्छुक वधू-वरांच्या परिवारांनी सहभागी होऊन अनावश्‍यक खर्चाला फाटा देत पैसा, वेळ व श्रमाची बचत करावी, असे आवाहन देवसंस्थान विश्वस्तांनी पत्रकार परिषदेद्वारा केले आहे.
सामुदायिक विवाह सोहळ्याच्या नियोजनाबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रमुख विश्वस्त राजकुमार लोढा, विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे पाटील, सॉलिसिटर प्रसाद शिंदे, व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर आदी उपस्थित होते.

-Ads-

सर्वसामान्य कष्टकरी, कामगार व शेतकऱ्यांना आपल्या मुला-मुलीचा विवाह करताना कर्ज काढून कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातून सामाजिक बांधिलकी व सलोखा जोपासला जावा. वेळ, अन्न, पैसा श्रमाची बचत होऊन अनावश्‍यक खर्चाला फाटा मिळावा. या हेतूने राज्याचे धर्मादाय आयुक्‍त शिवकुमार डिगे, पुणे विभागाचे सहआयुक्‍त शिवाजीराव कचरे यांच्या संकल्पनेतून राज्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळे राबविण्यात येत आहेत. जेजुरीमध्ये येत्या 10मे रोजी होणाऱ्या सर्वधर्मीय मोफत विवाह सोहळ्यामध्ये वधू-वरांच्या धर्माच्या रितिरिवाजानुसार विधी करण्यात येणार आहेत. सहभागी होणाऱ्या इच्छुक वधू -वरांच्या परिवारांनी संयुक्‍तकरित्या आपल्या वर -वधूच्या पासपोर्ट फोटो, जन्मदाखल्यासह नावनोंदणीसाठी देवसंस्थान कार्यालयाशी संपर्क साधावा. वधूचे वय 18वर्ष पूर्ण व वराचे वय 21वर्ष पूर्ण असणे आवश्‍यक आहे. वर -वधूच्या पालकांनी बिगरहुंड्याबाबत हुंडा दिला -घेतला नसलेबाबत प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे. वर पक्षाची 100 आणि वधू पक्षाची 100 अशी वऱ्हाडी मंडळी सहभागी करून घेण्यात येऊन त्यांना चहा, नाष्टा व सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. विवाहानंतर नववधू-वर यांना खंडोबा मंदिरात थेट देवदर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून वधूची खण-नारळाने ओटीही भरण्यात येणार आहे. देवसंस्थान समितीच्या या उपक्रमाचे यंदाचे पहिलेच वर्ष असून पुढील काळात दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती देवसंस्थान विश्वस्त मंडळाने दिली आहे. नावनोंदणीसाठी येत्या 3 मे पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)