जेजुरीत शेतकरी, अधिकारी आमने-सामने

संग्रहित छायाचित्र

बाह्यवळण महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी साधला संवाद

जेजुरी – पुणे-पंढरपूर पालखी महामार्गासाठी जेजुरी शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण महामार्गाबाबत आज जेजुरीत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी, भूसंपादन अधिकाऱ्यांनी संपर्क साधून बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी समोरा-समोर समजून घेतल्या. शेतकऱ्यांना विश्वासात घेवूनच हा मार्ग करण्याचे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले.
आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 वर जेजुरी शहराबाहेरून सहापदरी बाह्यवळण मार्ग होणार आहे. या संदर्भात दि. 3 फेब्रुवारीला अधिसूचना काढण्यात आली आहे, त्यानंतर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. बाह्यवळण मार्गासाठी सुमारे 330 शेतकऱ्यांची एकूण 83 एकर जमीनीचे भूसंपादन केले जाणार आहे. साधारणपणे 46.5 मीटर रुंदी आणि चार किलोमीटर लांबीचा हा बाह्यवळण मार्ग आहे. भूसंपादन करण्यासाठी तशा मोजणीच्या नोटीसा ही शेतकऱ्यांना आल्या आहेत. नोटीसीनुसार बुधवारी (दि.28) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी कर्मचारी मोजणीसाठी आले होते, कोणत्याही प्रकारची चर्चा न करता, संमती न घेता मोजणीसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाधीत शेतकऱ्यांनी रोखले होते.

या संदर्भात आज येथील ज्येष्ठ नागरिक भवनात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस, विशेष भूमी संपादन अधिकारी सुनील गाढे, नायब तहसिलदार संजय काटकर, मंडळाधिकारी प्रदीप यादव यांनी बाधित शेतकऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला शामकाका पेशवे, नगरसेवक सचिन सोनवणे, गणेश शिंदे, सचिन पेशवे, चंद्रकांत खोमणे, संजय खोमणे, बाळासाहेब झगडे, आप्पा भंडारी, मधुकर थोपटे, रामदास कोरे, सोमनाथ उबाळे, विशाल बारसुडे, बापू जगताप, मोहन महाजन, हनुमंत खोमणे आदी शेतकरी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत बाह्यवळण मार्गाबाबत माहिती देवून नकाशा दाखवण्यात आला, तरीही शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. मोजणी नंतर नेमके कोणाचे किती नुकसान होणार आहे. ते समजणार असल्याने शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध करू नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. शेतकऱ्यांनी ही वेगवेगळे मुुद्दे मांडून जेजुरीच्या खंडोबाचे महत्त्व कमी होऊ नये, असा प्रयत्न करावा, अशी मागणी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)