नीरा- नीरा (ता. पुरंदर) नजीक जेऊर येथील शेतकरी मोहन पांडुरंग तांबे (वय 42) यांनी राहत्या घरात सायंकाळी गुरुवारी (दि. 17) गळफास लावून आत्महत्या केली आहे. तांबे याच्यावर असलेल्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा गावात असून पुढील सत्य तपासाअंती स्पष्ट होईल. तांबे याचे कुटुंब नुकतेच विभक्त झाले होते. आत्महत्येपूर्वी तणावात असल्याचे त्यांनी मित्रांना सांगितले होते. याबाबत टोकाचा विचार करू नको, असा सल्लही त्यांना मित्रांनी दिला होता. त्याचबरोबर त्यांच्या वाट्याला आलेल्या अल्पशा जमिनीतून आळंदी-पंढरपूर मार्गातील नीरा बायपास रस्ता जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती, त्यामुळेही ते चिंतीत होते, असेही बोलले जात आहे. तांबे यांच्या आत्महत्येचे नक्की कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. याबाबत रात्री उशिरा माहिती देण्यात आली असून पुढील तपास जेजुरी पोलीस करीत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा