जेंव्हा नेत्यांना जाग येते..

मधुसूदन पतकी 

महाराष्ट्र हा कणखर, राकट आणि दगडांचा देश आहे. सुकाळ आणि दुष्काळाचाही देश आहे. सातारा जिल्ह्यात तर राज्यातले हे दोन्ही प्रकार पहायला मिळतात.एकीकडे महाबळेश्‍वर सारखा राज्याचे चेरापुंजी तर दुसरीकडे माण,खटावमधला दुष्काळी भाग.या दोन्हीच्या प्रकारच्या हवामानात जिल्ह्यातील जनता रहात आहे. जगत आहे. एकीकडे साठवलेले, साठलेले पाणी दुष्काळी भागाकडे मागत आहे. आता हे मागणे शासनाकडे असते. लोकप्रतिनिधींकडे असते.

लोकप्रतिनिधी या दुष्काळ, पाण्याचे भांडवल करून निवडणुका जिंकतात,यावरून निवडणुका हरतात.पण भांडवल बदलत नाही. सातारा जिल्ह्यातले पाणी सांगली,पुणे,पार सोलापूर पर्यंत बिनबोभाट जाते पण सातारा जिल्ह्यात या धरणांपासून पासून शंभर सव्वाशे किलोमिटर अंतरावर पोचत नाही आणि त्याचा खेद खंत ही कोणा निर्णय कर्त्यांना वाटत नाही.
दुष्कालातील मंडळी पाणी आणूशकत नाहीत तर किमान तालुका , मतदार संघ दुष्काळी म्हणून मान्यता आणण्याच्या खटपटीत आहेत. मग मोर्चा, चर्चा,आंदोलन,महामंडळाची स्थापना,लवाद,वाद,विवाद असे अनेक प्रकार सुरु होतात.दुष्काळ आहे म्हणून आम्हाला सवलत द्या अशी मागणी करणे आणि होणे आवश्‍यक ,औचित्याला धरून आहे.

दुष्काळी भागातील जनतेचे जगणे सोपे नाही ,त्रास आहे ,जगण्याची धडपड आहे.त्यात कर्जबाजारीपण आणि असुरक्षीतता या सगळ्यातून मार्ग काढणे हे सोपे नाही. अशा परिस्थीतीत आपली लढाई ; आपल्यालाच लढावी लागते हे वास्तव दुष्काळी भागातील जनतेला आता चांगले समजले आहे. मात्र नेते मंडळींना त्यांना समजलेले वास्तव समजलेले नाही. दुष्काळ जाहीर झाल्यावर आठ,दहा दिवसांनंतर नेते मंडळी जर आंदोलन अन्‌ मोर्चे काढणार असतील तर दुष्काळी भागातील जनते बाबत त्यांना किती कळवळा आहे हे सहज समजते.

आता विषय येतो तो दुष्काळ हटवण्याच्या आणि संपवण्याच्या प्रक्रियेचा.त्यासाठी समाजसेवी संस्था आपापल्या पातळीवर काम करत आहेत. अमिरखानला दुष्काळाची तिव्रता समजते.अक्षयकुमार आणि सलमानखानला कर्जबाजारीपणाचे शल्य समजते आणि मकरंद अनासपूरे ,नाना पाटेकर ,सयाजी शिंदेला दुष्काळ कमी करण्याची कृतीशील इच्छा होते,मात्र दुष्काळ हे ज्यांचे भांडवल आहे त्यांना तो संपावा किंवा त्यावर फार मोठा तोडगा निघावा असे का वाटावे ? वर्षानुवर्षे सत्तेत असताना प्रश्‍न सुटले नाही आता सत्तेबाहेर आहे तेंव्हा सत्ता द्या प्रश्‍न सोडवततो म्हणायचे.किंवा सत्तेत गेल्यावर आम्हाला कुठे पुरेसा वेळ मिळाला हे सांगायचे यावर तोडगा म्हणून पाणी,प्रदुषण,शिक्षण,आरोग्य ही खाती कोणत्याही राजकीय परिघात ठेवायची नाही. ती स्वायत्त असावीत.

मंत्री म्हणून त्या खात्याचा कार्यभार सांभाळायचा आणि राज्याचे भले करण्याच्या थाटात आपलेच चांग भले करायचे हा प्रकार अनेकदा पहायला मिळाला आहे. हजारो कोटी रुपये सिंचनासाठी खर्चून सिंचना खाली जे क्षेत्र यायला पाहिजे ते आले नाही हे सांगीतले जाते तेंव्हा दुष्काळा कोणाला आवडतो आणि डिंसेंबर नंतर दुष्काळ जाहीर करा म्हणणाऱ्या नेत्यांना दुष्काळाच्या प्रश्‍नावर का जाग येते हे आता समजणारे वास्तव आहे. फी माफी, विज बिल सवलत, पाणी पुरवठा,चारा आणि छावणी ,स्वस्त धान्य या गाजरांपलीकडे फारकाही हाताशी लागत नाही. हा अनुभव असताना दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर तो हटावा अशी पंचवार्षिक योजना आपल्या काळात आखावी किंवा सर्वसामान्यांबद्दल किती कळवळा आहे हे महनीय नेत्यांनी प्रांजळपणे सांगावे. उगा मोर्चा ,आंदोलनात त्यांची शक्ती वाया घालवू नये.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)