जून महिन्यात पावसाचा रुसवा

पिंपरी – हवामान खात्याने यावर्षी चांगला पाऊस पडणार असल्याची शक्‍यता वर्तवली आहे. शक्‍यतेस खरे ठरवत गेल्या एक महिन्यापासून रोज आकाशात ढग दाटून येत आहेत. परंतु इंद्रदेव रुसले असल्याप्रमाणे हे ढग केवळ आकाशात एकत्र येत आहेत, बरसत नाहीत. जून महिन्यात मोजके दोन-तीन दिवस सोडले तर मोठा पाऊस झाला नाही. तसेच कोरड्या दिवसांचे प्रमाणही अधिक आहे. पावसाळ्याच्या या पहिल्याच महिन्यात शहर आणि मावळ परिसरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीसाठ्यात केवळ दीड टक्‍क्‍याने वाढ झाली आहे.

हवामान आणि पर्जन्यमानाचा अभ्यास करणाऱ्या एका खासगी संस्थेनुसार पिंपरी चिंचवड शहरात जून महिन्यात सरासरी 175 ते 185 मिमी इतका पाऊस पडतो. पिंपरी-चिंचवड शहरात पर्जन्यमानाची नोंद केली जात नसल्याने पुण्यात पडलेल्या पावसाचे आकडे ग्राह्य धरले जातात. पुण्यात जून महिन्यात 148 मिमी इतका पाऊस पडला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडची सरासरी जवळपास सारखीच आहे. यामुळे सरासरीपेक्षा पाऊस कमी पडला असल्याचे दिसत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एप्रिलमध्ये सरासरी 18 मिमी, मे मध्ये 25 मिमी पाऊस पडतो. एप्रिलमध्ये पावसाचे दोन आणि मेमध्ये पावसाचे सरासरी तीन दिवस असतात. यावर्षी तोही पाऊस पडलेला नाही. जून महिन्यात पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाचे सरासरी 17 दिवस असतात. परंतु यावर्षी 17 दिवसही पाऊस पडलेला नाही. सर्वाधिक पाऊस जुलैमध्ये 23 आणि ऑगस्टमध्ये 24 दिवस पडतो. सप्टेंबरमध्ये 14 दिवस पावसाची सरासरी आहे. जूनमध्ये कोरड्या दिवसांची संख्या अत्याधिक असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्कायमेट वेदर आणि पुणे वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील संपूर्ण आठवडा रोज हलक्‍या ते मध्यम स्वरुपाच्या एक ते दोन सरी रोज पडत राहण्याची शक्‍यता आहे. सतत येत असलेल्या ढगांमुळे आणि रिमझिम पावसामुळे वातावरण सध्या आल्हाददायक झाले आहे. कमाल आणि किमान तापमानात ही एक डिग्री ते 0.6 डिग्री सेल्सियस इतकी घट झाली असल्याचे दिसून येत आहे.

पावसाची कमतरता पाणी पुरवठ्यासोबत शेतीसाठी देखील काळजीचे कारण ठरत आहे. शहराच्या बाह्यभागांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. न बरसणाऱ्या ढगांमुळे या शेतकऱ्यांच्या मनातही आता चिंतेचे ढग दाटू लागले आहे. विशेषतः भात पीके घेणारे शेतकरी खूपच चिंतातुर आहेत. शेतकऱ्यांचे डोळे आता ढगाकडे लागले असून हे ढग जोरदार वर्षाव कधी करणार याची ते वाट पाहत आहेत. पेरणी केलेल्या काही शेतकऱ्यांची पीके पिवळी पडू लागली आहेत. शुक्रवारी अगदी थोड्या वेळासाठी पडलेल्या पावसामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस पाऊस सातत्याने पडत रहावा अशी अपेक्षा आता जगाचा अन्नदाता व्यक्‍त करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)