जूनपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ३० हजार कि.मी रस्त्यांची कामे पूर्ण करणार -देवेंद्र फडणवीस

नागपूर: देशात व राज्यात रस्ते विकासाची कामे वेगात सुरु असून जूनपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 30 हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतील. यामध्ये 500 किलोमीटर रस्ते वर्धा जिल्ह्यातील असतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय) यांच्या वतीने हिंगणघाट येथील टाका मैदान येथे वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील रस्ते विकासाच्या विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, आमदार अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार डॉ. रामदास आंबटकर, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्ह्याचे समग्र चित्र पालटते आहे. विविध योजनांची कामे जिल्ह्यात व हिंगणघाट येथेही वेगात सुरू आहेत. रस्ते विकासाच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन होत आहे ही बाब हिंगणघाटवासियांसाठी तसेच वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंददायी आहे. राज्यात महामार्गाची कामे प्रगतीपथावर आहेत. चार वर्षात मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. चार वर्षात वीस हजार किलोमीटरपर्यंत राष्ट्रीय महामार्गांची कामे झाली. 4 हजार किलोमीटर राज्य महामार्ग व 30 हजार किलोमीटरचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गतच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून जूनपर्यंत 30 हजार किलोमीटरपर्यंतचे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहेत. यामध्ये पाचशे किलोमीटरचे रस्ते वर्धा जिल्ह्यातील आहेत. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून रोजगार निर्मितीत वाढ होत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2014 पर्यंत राज्यात 50 लाख शौचालये होती. 2015 ते 2018 या तीन वर्षात 60 लाख शौचालये बांधण्यात आली. एकही व्यक्ती बेघर राहणार नाही असा निर्धार असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जूनपर्यंत साडेदहा लाख कुटुंबांना घरे देण्याचा मानस असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

शेतीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेक संकटांवर मात करत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी सतत उभे आहे. राज्यात यंदा काही भागात पर्जन्यमान कमी झाले. 180 तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली. शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत देण्यात येत आहे. मात्र जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जलसंधारणाच्या झालेल्या विविध कामांमुळे शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे आढळून येत आहे. शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली, कर्जमाफी देण्यात आली. तीन वर्षात साडेआठ हजार कोटी रुपयांची धान्य खरेदी करण्यात आली.

विदर्भातील सिंचन योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबतील. अमरावती येथील टेक्स्टाइल पार्कप्रमाणेच विदर्भात अन्यत्रही टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीसाठी भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. याद्वारे रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. सिंदी येथील ड्राय पोर्ट तसेच समृद्धी महामार्गामुळे विदर्भाचे चित्र पूर्णपणे पालटणार आहे. गावाच्या व शहराच्या विकासासाठीही भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच विदर्भातील नझुल जमिनींच्या संदर्भातील प्रश्‍न सोडविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)