जुन्या कालव्याला पाणी आणण्यात आमदारांचे दुर्लक्ष

  • हवेली, दौंड, इंदापुरातील शेतकरी जुन्या मुठाच्या अवर्तनांपासून वंचीत
  • चार वर्षांपासून एकही आवर्तन नाही
  • कालव्याचे झाले गटार आणि कचराकुंडी

लोणी काळभोर – खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांच्यापाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे, त्यामुळे चारही धरणांत पाणीसाठा आहे. नव्या मूठा उजव्या कालव्यातून शेतीला पाणी बारा तास सुरू आहे. परंतु, हवेली व दौंड, इंदापूर तालुक्‍यातील शेतकाऱ्यांकरिताची शेतीसाठी जलवाहिनी ठरलेल्या जुन्या मुठा उजवा कालवा मात्र कोरडा पडला आहे. या तीनही तालुक्‍यांतून निवडून आलेले भाजपचे बाबुराव पाचर्णे, रासपचे राहुल कुल आणि राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे असे वेगवेगळ्या पक्षाचे असल्याने याकामी त्यांच्यामध्ये कधीच एक वाक्‍यता दिसलेली नाही. यामुळे जुन्या कालव्यातून शेतीला मिळणारी आवर्तन गेल्या चार वर्षात जवळपास बंदच झाली आहेत.
पुणे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी व हवेली, दौंड व इंदापूर तालुक्‍यातील 66 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील शेतीला पाणी पुरवठा खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चार धरणांमधून केला जातो. पुणे शहराची लोकसंख्या कमी असल्याने सुरवातीला (20 वर्षांपूर्वी) साडे सहा टीएमसी पाणी पुणे शहराला पिण्यासाठी पुरेसे होत होते. परंतु, आता लोकसंख्या वाढल्याने शहराची पिण्याच्या पाण्याची गरज वाढली आहे. सध्या, जवळपास 15 ते 16 टीएमसी पाणी पुणे शहराला पिण्यासाठी लागते. 29 टीएमसी पाणी चारही धरणात साठते. त्यापैकी 16 टीएमसी पाणी पुणे शहराला पिण्यासाठी पुरविल्यानंतर राहिलेल्या 13 टीएमसी पाण्यापैकी साधारण अडीच ते तीन टीएमसी पाणी बाष्पीभवनाद्वारे निघून जाते किंवा पाझरते. उर्वरित 11 टीएमसी पाणी तीन तालुक्‍यातील 66 हजार हेक्‍टर क्षेत्रावरील शेतीला पुरविले जाते. परंतु, हे पाणी या क्षेत्राला कमी पडत आहे. त्यातच पुणे शहरात आठही आमदार सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्यामुळे शेती ऐवजी पुण्याला पाणी देण्याकडे या आमदारांचा कल असतो. शेतीला पाणीपुरवठा करण्याकडे या आमदारांचे कायमच दुर्लक्ष असते.
पुणे महानगरपालिका आणि पाटबंधारे खाते यांच्या मध्ये 1997 मध्ये करार करण्यात आला होता. यानुसार अतिरिक्त सहा टीएमसी पाणी मुळा मूठा नदीतून उचलून मुंढवा येथे या पाण्यावर प्रक्रिया करायची. नंतर हे पाणी जुन्या मूठा उजव्या कालव्यामधून हवेली व दौंड तालुक्‍यातील खुटबाव पर्यंतच्या शेतीला पाणीपुरवठा करायचा. हे काम पूर्ण करायला पुणे महापालिका प्रशासनाने तब्बल 18 वर्षे लावली. हे काम पूर्ण झाल्याचे राज्य जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी जाहीर करीत मुंढव्याच्या जॅकवेलचे उद्‌घाटनही केले होते. परंतु, पाटबंधारे विभागाच्या वतीने जुन्या कालव्याच्या दुरुस्तीची कामे यापूर्वीच व्हायला पाहिजे होती ती अजूनही झालेली नाहीत. त्यामुळे जुन्या कालव्यातून शेतीला कधी पाणी मिळेल हे निश्‍चित नाही. नव्या कालव्याला पाणी असले तरी जुन्या कालव्यावर अवलंबून असलेले क्षेत्र मात्र कोरडेच राहत आहे. यामुळे पाणी असूनही शेतकरी हवालदिल झाले आहेत.

  • कालव्यावरील अनेक कामे रेंगाळलेलीच…
    कुंजीरवाडी येथे जुना कालवा दुरूस्तीचा शुभारंभ 26 फेब्रुवारी 2015 मध्ये करण्यात आला होता, त्यावेळी पहिल्या टप्प्यांमध्ये 28 ते 82 किलोमीटरमधील 18 नवीन गाव रस्ता पूल, नाल्यावरील 14 नवीन कॉज-वे, 35 नवीन सिंचन विमोचके, 2 काटनियामक व अतिवाहक आणि 4 नलिका मोऱ्या आदी कामे तातडीने पुर्ण करून एप्रिल 2015 मध्ये कालव्यातून 2.50 टीएमसी पाणी सोडण्यात येणार, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित असलेला बळीराजा आता यापुढे आपल्या शेतीसिंचनासाठी बारमाही पाणी मिळणार, पाण्यासाठी इतरांकडे हात पसरावे लागणार नाहीत. या अपेक्षेने सुखावला होता. परंतु, घोषणा करून चार वर्षे झाले तरीही कालव्यातून पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे.
  • आतापर्यंत कोट्यवधी रूपये खर्च…
    जुन्या मुठा उजव्या कालव्याच्या दुरूस्ती, सफाईसाठी आजपर्यंत कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले आहेत. यापूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने 43 कोटी रूपये याकामी खर्च केले होते, त्यावेळी एवढा खर्च करूनही कालव्यातून आजपर्यंत पाणी वाहिलेले नाही. आताच्या शासनाने तर या कामाकडेच गेल्या चार वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे. दुरूस्ती व साफ केलेल्या कालव्यात सध्या झाडेझुडपे वाढली आहेत. तर, शहरी भागातील कालव्या नजीक इमारती वाढल्याने नागरीकांनी या कालव्यात सांडपाणी सोडले आहे तसेच कचराकुंडी म्हणूनही याच कालव्याचा उपयोग होत असल्याने कधी काळी शेतकरीता वरदान ठरलेला हा कालवा गटार झाला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)