जुन्या कारचा व्यवसाय मंदावला

पिंपरी – गेल्या दोन महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवे उच्चांक गाठले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा परिणाम प्रत्येक क्षेत्रावर होताना दिसत आहे. परंतु या दरांचा परिणाम सर्वाधिक जुन्या कार विक्री व्यवसायावर झाला असल्याचे दिसून येत आहे. जुन्या कार खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या मते यावर्षी बाजार खूपच मंदावला असून सुमारे 40 टक्‍क्‍यांनी विक्री घटली आहे.

प्रत्येकाचे स्वप्न असते की आपल्याकडे एखादी चांगली कार असावी. नव्या कारच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्‍याच्या बाहेर असतात. अशावेळी सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण करतात जुन्या कार. जेवढ्या प्रमाणात नव्या कार बाजारात येतात, त्याच्या किमान 55 ते 60 टक्‍के जुन्या कार विक्रीसाठी उपलब्ध होतात. या जुन्या कारच कित्येकांची कार घेण्याची स्वप्ने पूर्ण करतात. दिवाळीपूर्वी जुन्या कार बाजारात खूप तेजी असते. नवीन आणि लेटेस्ट मॉडल घेण्यासाठी इच्छुक असणारी मंडळी आपली जुनी कार विकून नवीन कार घेतात. त्यामुळे दिवाळीपूर्वी जुन्या कार बाजारात येतात.

-Ads-

दिवाळीनंतर एक ते दोन महिन्यांनी वर्ष संपते. त्यामुळे जुनी कार एक वर्ष अधिक जुनी होते. सध्या जुन्या कार घेण्यासाठी देखील कर्ज मिळते. परंतु कार सात वर्षांपेक्षा अधिक जुनी असल्यास कर्ज मिळण्यास त्रास होतो. यामुळे वर्ष संपण्यापूर्वी कार विक्री करण्याकडे व्यावसायिकांचा देखील भर असतो. कारची ओळख ही “कोणत्या ईयरचे मॉडल आहे?’ अशी देखील होत असते. परिणामी सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये जुन्या कार बाजारात विक्रीसाठी भरपूर कार असतात.

घेणे नव्हे तर चालवणे आवाक्‍याबाहेर
सध्या बाजारात 50 हजारांपासून ते 20 ते 30 लाखांपर्यंत जुन्या कार उपलब्ध आहेत. काही लक्‍झरियस कार ज्यांची शोरुम प्राइस आठ ते दहा लाख रुपये आहे, त्या देखील जुन्या कार बाजारात दोन ते चार लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. कित्येक जणांची या महागड्या कार स्वस्तात घेण्याची क्षमता आहे. परंतु सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर इतके अधिक वाढले आहेत की, सर्वसामान्यांना कार घेणे शक्‍य आहे परंतु चालवणे आवाक्‍याबाहेर होत चालले आहे. कार घेण्यापूर्वी सर्वसामान्य व्यक्‍ती ती आपल्या रोज चालवण्यासाठी परवडेल का? याचा सर्वांत आधी विचार करतो. पूर्वी पेट्रोलवरील दुचाकी आणि डिझेलवरील किंवा गॅसवरील चारचाकी यांच्या खर्चामध्ये जास्त फरक नव्हता परंतु आता पेट्रोल 85 तर डिझेल 75 रुपयांच्या पुढे गेले असल्याने 10 ते 15 किलोमीटर प्रति लिटर ऍव्हरेज देणारी कार आता परवडणे अशक्‍य वाटू लागले आहे.

वीस वर्षात 450 टक्‍क्‍याहून अधिक वाढ
सर्वसामान्यांच्या क्रयक्षमता वाढल्याने तसेच प्रतिस्पर्धेच्या युगामध्ये कारचे दर घसरल्याने तसेच कारवर कर्ज सहज उपलब्ध होत असल्याने कारच्या संख्या खूप अधिक वाढली आहे. वीस वर्षांपूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रत्येक एक हजार व्यक्‍तींमागे 185 दुचाकी आणि 27 चारचाकी वाहने होती. आज प्रत्येक एक हजार व्यक्‍तींमागे 663 दुचाकी सुमारे 150 कार आहेत. याचा अर्थ वीस वर्षांमध्ये कार विक्रीमध्ये 455 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यामुळे जुन्या कार बाजारात देखील सर्व पक्रारच्या कार खूप अधिक प्रमाणात आहे.

प्रतिक्रिया
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याचा फटका या व्यवसायास देखील बसला आहे. यावर्षी सुमारे 30 ते 40 टक्‍क्‍यांनी व्यवसाय कमी झाला आहे. मागणी जास्त नसल्याने दरही कमी झाले आहेत. कित्येक चांगल्या सेकंडहॅंण्ड कार सध्या अत्यंत कमी दरात बाजारात उपलब्ध आहेत.
– शहानूर सय्यद, व्यावासायिक, पिंपळे गुरव

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)