जुन्या कांद्याचा नवीन “हळवी’ला फटका

भाव गडगडले : शेतकरी हवालदील

पुणे – मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या जुन्या कांद्याचा फटका नवीन हळवी कांद्याला बसला आहे. जुन्या कांद्याला तर फारसा भाव मिळतच नाही. मात्र, हा कांदा उपलब्ध असल्याने नवीन कांद्यालाही भाव मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. मार्केट यार्डातील कांदा विभागात जुन्या कांद्याला दर्जानुसार प्रती किलोस 4 ते 7 रुपये, तर नवीन कांद्याला 10 ते 12 रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.

रविवारी मार्केट यार्डात तब्बल 150 ट्रक कांद्याची आवक झाली. त्यामध्ये जुना कांदा तब्बल 100 ट्रक, तर नवीन कांद्याची 50 ट्रक इतकी आवक झाली. येथील बाजारात नगर जिल्ह्यातून विशेषत: श्रीगोंदा तालुक्‍यातून जास्त आवक होत आहे.

मागील वर्षी कांद्याला उच्चांकी भाव मिळाला. त्यामुळे यंदा गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले गेले आहे. विशेषत: या चार राज्यातच कांद्याला जास्त मागणी असते. मात्र, यावर्षी तेथून कांद्याला मागणी नाही. त्यामुळे राज्यातून होणारी निर्यात घटली आहे. त्यातच भाव जास्त मिळेल, या अपेक्षेने राज्यात जुना कांद्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात आली आहे. मागील चार महिन्यांत कांद्याच्या भावात वाढ झालीच नाही. आता नवीन कांदा आल्याने वाढ मिळणारच नाही, हे ओळखून मिळेल त्या भावाने विक्री करण्यासाठी जुना कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात आणण्यात येत आहे. दर्जा खराब असला तरीही नव्यापेक्षा निम्म्या भावाने उपलब्ध असल्याने जुन्या कांद्याचीच बाजारात चलती आहे. हॉटेल, कॅटरींग व्यावसायिक, मेस चालकांकडून जुन्या कांद्याचीच खरेदी करण्यात येत आहे. परिणामी, नवीन कांद्यालाही भाव मिळेनासा झाला आहे.

साठवून केलेला जुना कांदा बराच शिल्लक आहे. डिसेंबर अखेरपर्यंत त्याची आवक चालू राहणार आहे. तोपर्यंत नव्या कांद्याचे भाव वाढणार नाहीत.

– रितेश पोमण, व्यापारी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)