जुन्या कांद्याने भाव खाल्ला!

पिंपरी – पिंपरी बाजारातील लाल बहादूर शास्त्री भाजी मंडईत नवीन कांदा दाखल झाला असून, त्याचे दर 25 रूपये प्रतिकिलोच्या जवळपास असल्याने बाजारात आवक कमी प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे बाजारात मिळत असलेल्या जुन्या कांद्याला जास्त मागणी होत असून, त्याचे दर 10 रूपये किलो ते 16 रूपये किलोने विकला जात आहे. तसेच, दर दिवाळीपर्यंत स्थीर राहणार असून, नंतर वाढण्याची शक्‍यता आहे.

सध्या नवीन कांद्याची आवक पुण्याच्या बाजारात सुरू झाली असून त्याची घाऊक खरेदी 18 रूपयाच्या जवळपास आहे. त्यामुळे शहरात त्या नवीन कांद्याचे दर 25 रूपये किलोच्या जवळपास आहे. एवढा भाव सांगितल्यावर ग्राहक कांदे घ्यायला मागे पुढे पाहत आहेत. त्यामुळे सध्या जुन्या कांद्याला मागणी वाढल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.
गेल्या महिन्यात कांद्यांची आवक घटल्याने त्याचे दर 20 रूपये किले झाले होते. यामुळे ग्राहकांनी कांद्याच्या खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र, गेल्या काही आठवड्यापासून पुण्याच्या बाजारात तसेच पिंपरीच्या बाजारात कांद्याची आवक वाढल्यामुळे त्याचे दर आवाक्‍यात आले आहेत. तेव्हा पासून कांदे 10 रूपये ते 16 रूपये किलोने विकल्या जात आहे. दिवाळी पर्यंत हेच दर राहण्याची शक्‍यता असल्याची माहिती भाजीविक्रेता सागर थोरात यांनी दिली. पुण्याच्या बाजारात मोठ्या प्रमाणात संगमनेरवरून कांद्याची आवक होते. तसेच लासलगाववरून ही आवक होते. मात्र, संगमनेर जवळ असल्याने तिथल्या मालाला स्थानिक व्यापाऱ्यांची जास्त पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

कांद्याचे देखील विविध प्रकार असून त्यानुसार त्याची विक्री होत असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये त्यावरून वाद होत असल्याचे ही विक्रेत्यांनी सांगितले. पुण्याच्या बाजारात उच्च गुणवत्तेच्या कांद्याला घाऊक बाजारात 1200 रूपये क्विंटल भाव मिळाला आहे. तर सुपर कांदा 1100 ते 1000 रूपये क्विंटल भाव मिळाला आहे. गोल्टा कांदा 600 ते 500 रूपये क्विंटल आहे. मिडिअम कांदा 700 ते 900 रूपये क्विंटल आहे. गोल्टी कांद्याला 400 ते 500 रूपये क्विंटल आहे. जोड कांदा 200 ते 300 रूपये क्विंटल आहे. यामुळे पिंपरी बाजारात विक्रीसाठी आलेल्या कांद्याला वेगवेगळे भाव दिसत असल्याने नागरीक जास्त भाव असलेल्या ठिकाणावरून पाय काढताना दिसत आहेत. तर काही नागरीक कांद्याच्या गुणवत्तेनुसार त्याचे दर देतांना दिसून येत आहेत.

कांद्याचे दर क्विंटलनुसार
चांगल्या गुणवत्तेचा कांदा -1200
सुपर कांदा -1100 ते 1000
मिडिअम कांदा-700 ते 900
गोल्टा कांदा-600 ते 500
गोल्टी कांदा- 400 ते 500
जोड कांदा-200 ते 300

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)