जुन्या इमारतींना मिळणार कॉर्पोरेट लूक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेसाठी 14 कोटींच्या खर्चास मंजुरी

– डॉ. राजू गुरव

-Ads-

पुणे – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या जुन्या इमारतींचे नूतनीकरण करण्यात येणार असून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी राज्य शासनाने सुमारे 14 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली असून आता इमारतींना कॉर्पोरेट लूक मिळणार आहे.

प्राथमिक शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची (एमएससीईआरटी) स्थापना करून कामकाज करण्यासाठी सदाशिव पेठेतील कुमठेकर मार्गावर 1964 मध्ये इमारती उभारण्यात आल्या आहेत. साडेचार एकर जागेवर मुख्य इमारतीसह इतर इमारती बांधण्यात आल्या. या सर्वच इमारती जुन्या झाल्या असून अनेक वर्षांपासून या इमारतींची दुरवस्था झाली आहे. कित्येक वर्षांपासून या इमारतींची डागडुजीच करण्यात आलेली नाही. इमारतींच्या भिंतींना चिरा पडल्या असून पत्रे तुटले आहेत. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. पाणी पुरवठ्याच्या वाहिन्याही गंजल्यामुळे पाण्याची पुरेशी सुविधाही उपलब्ध होत नाही. ड्रेनेज वाहिन्या व विद्युत केबलही तुटलेल्या आढळतात. स्वच्छतागृहांची पुरेशी सुविधाही उपलब्ध नाही. राज्यातील विविध भागातून प्रशिक्षणासह इतर विविध कामांसाठी शिक्षक मोठ्या संख्येने कार्यालयात नेहमी येत असतात. त्यांच्यात सुविधांबाबत नाराजीचा सूर उमटत आहे. अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी शिक्षकांनाच नेहमीच गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

जुन्या इमारतींचे सीओईपीकडून स्ट्रक्‍चरल ऑडीट करण्यात आले. त्या अहवालानुसार इमारतींचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी परिषदेचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे या जुन्या इमारतीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव पाठविला. आता शासनाकडून त्यास मंजुरी मिळाली आहे.

एमएससीईआरटीच्या मुख्य इमारतीसह दृक श्रवण इमारत, पुरुष व महिलांचे वस्तीगृह, आयटी., ग्रंथालय, सभागृह या इमारतींचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने एकूण 13 कोटी 87 लाख रुपये खर्चास मान्यता दिली आहे. विद्युतीकरणासाठी 1 कोटी 51 लाख रुपये, पाणीपुरवठा व स्वच्छतागृहांच्या कामासाठी 22 लाख 41 हजार रुपये, वातानुकुलीत यंत्रणेसाठी 77 लाख 39 हजार रुपये, अग्निशमन यंत्रणा उभारण्यासाठी 49 लाख 17 हजार रुपये खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. इमारतींमध्ये व आवारात सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार असून यासाठी 22 लाख 44 हजार रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. आकस्मिक निधी म्हणून 57 लाख 63 हजार रुपयांची तरतूदही अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. रोपांची लागवड करून परिसर हिरवागार करण्यात येणार आहे. यासाठी 50 लाख रुपये खर्च होणार आहेत. बांधकामासाठी महापालिकेला 38 लाख 73 हजार रुपयांचे शुल्क अदा करण्याचीही तरतूद करण्यात आली. इमारतींना आकर्षक रंगरंगोटी करण्याबरोबरच कार्यालयातील अंतर्गत सजावटींच्या कामानांही प्राधान्य देण्यात येणार आहे.

बालभारतीच्या स्थापत्य विभागामार्फत लवकरच निविदा प्रक्रिया राबवून ही सर्व कामे सुरू करण्यात येईल. येत्या दीड – दोन वर्षांत सर्व कामे पूर्ण होतील, असे एमएससीईआरटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)