जुन्नर बाजार समितीत शेतकऱ्यांचा गोंधळ

अडतदारांच्या असहकारामुळे आक्रमक ः सभापतींच्या आश्‍वासनानंतर लिलाव सुरू

  • कांदा लिलाव अचानक बंद केल्याने वाढला तणाव

जुन्नर – जुन्नर कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या आवारात असणाऱ्या कांद्याच्या लिलावाच्या गाळ्यांच्या वाटपावरून अडतदारांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने कांदा लिलाव प्रक्रिया बंद पाडण्याचा निर्णय काही अडतदारांनी घेतल्याने शेतकरी संतप्त झाले. संतप्त शेतकऱ्यांनी व अडतदारांनी बाजार समितीच्या कार्यालयात गोंधळ घालत आंदोलन केले. सभापती ऍड. संजय काळे यांनी शेतकरी व अडतदार यांच्यावर अन्याय करणारा निर्णय न घेता हिताचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने असहकार पुकारणाऱ्या अडतदारांनी लिलाव प्रक्रिया सुरु केली व शेतकऱ्यांचा विरोधही मावळला.
कांद्याच्या भावात सध्या चांगलीच वाढ झाल्याने जुन्नर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. वाढलेला कांदा ठेवण्यासाठी बाजार समितीमध्ये पुरेशी जागा नसल्याने कांदा व्यापारी सुशील अशोक घोलप यांना कांदा, बटाटा व लसूण लिलावासाठी ठेवण्यासाठी बाजार समितीच्या आवारातील खरेदी विक्री संघाशेजारील फुलमार्केट शेडमधील दोन गाळे देण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला. याबाबतचे पत्र बाजार समितीने व्यापारी धनेश संचेती यांना दिले. या पत्रात धनेश संचेती यांना पिंपळाच्या झाडाजवळील सुभाष परदेशी यांच्याकडील बाजार समितीने काढून घेतलेले दोन गाळे वापरण्यास सांगण्यात आले. बाजार समितीने घेतलेला निर्णय एकतर्फी व पूर्वग्रह दूषितपणाने घेतल्याचे सांगत या निर्णयाच्या विरोधात जात जुन्नरमधील काही अडतदारांनी आज सकाळी अचानक कांदा लिलाव न करण्याचा निर्णय घेतला. अडतदारांनी घेतलेल्या भूमिकेने कांदा उत्पादकांची अडचण निर्माण झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेतला. संतप्त शेतकऱ्यांनी व अडतदारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गोंधळ घालत आंदोलन केले. बाजार समितीचे सभापती ऍड. संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक निवृत्ती काळे, प्रकाश ताजणे यांसह संचालकांनी आंदोलक शेतकऱ्यांशी व अडतदारांशी चर्चा करत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तर बाजार समितीद्वारे शेतकरी व अडतदार यांच्यावर अन्याय होणारे निर्णय न घेता समन्वयाने व त्यावर येत्या मंगळवारी विशेष सभा बोलावून हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन काळे यांनी दिल्यावर शेतकरी व अडतदार यांनी मवाळ भूमिका स्वीकारत लिलाव प्रक्रिया सुरु केली.

  • राजकीय बदल कारणीभूत?
    पूर्व कल्पना न देता केवळ राजकीय मतभेदामुळे बाजार समितीने घेतलेला निर्णय मान्य नसल्यानेच आंदोलन करण्यात आल्याचे धनेश संचेती यांनी सांगितले. एकूणच बाजार समितीच्या आवारात झालेल्या गोंधळाचा बाजार समितीच्या यापूर्व काळात घडलेल्या राजकीय घटना, बाजार समिती सत्तांतर याच्याशी संबंध जोडला जात असल्याची चर्चा लिलावादरम्यान सुरु होती.

    बाजार समितीमध्ये कांद्याचा व्यापार करणाऱ्या जुन्या व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक नवीन व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा तसेच जुन्या कांदा व्यापाऱ्यांनी बाजार समितीमध्ये मोनोपॉली निर्माण केली आहे. त्यामुळे लिलाव बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. तर नवीन व्यापाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने हा पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांना वेठीस धरून नवीन व्यापाऱ्यांची गळचेपी करण्याचा हा प्रयत्न योग्य नाही.
    -सुशील घोलप, कांदा व्यापारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)