जुन्नर तालुक्‍यात पाण्याचे नियोजन उत्तम

शरद सोनवणे ः विरोधकांनी पाण्यावरून राजकारण करू नये

जुन्नर- परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यानंतरही जुन्नर तालुक्‍यात पाण्याचे नियोजन उत्तम पद्धतीने केले असून, विरोधकांनी पाण्याचे राजकारण करू नये, असे आवाहन जुन्नर तालुक्‍याचे आमदार शरद सोनवणे यांनी केले. तालुक्‍यातील पाण्याचे नियोजन, धरणातील शिल्लक पाणीसाठा, टॅंकर उपाययोजना आदी विषयांवर माणिकडोह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आपल्या राजकीय अस्तित्वाची पोळी भाजण्याकरिता विरोधक आंदोलने करत असले तरी शेतकरी आणि नागरिकांमध्ये पाणीवापराबाबत समतोल साधून पाटबंधारे विभागाने पाण्याचे योग्य नियोजन केल्याचे सोनवणे यांनी या प्रसंगी सांगितले. याबरोबरच तालुक्‍यातील नागरिकांसाठी जूनअखेर पिण्यासाठी पाणी शिल्लक ठेवण्यात आले असून, शेतकऱ्यांनी पिके जगविण्यासाठी आपल्या मोटारी मर्यादित स्वरूपात वापराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर, कानडे, सहाय्यक अभियंता सुचित्रा डुंबरे, सपना डुंबरे, निवासी नायब तहसीलदार सचिन मुंढे, उपअभियंता मिलिंद बागुल, शाखा अधिकारी सुहास काळे, राजेंद्र रावले, काशिनाथ देवकर, जे. डी. घळगे, मांडे प्रकाश, बी. आर. सावंत, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी रामचंद्र तळपे, यांत्रिकी विभागाचे आत्माराम कसबे, बारवचे सरपंच संतोष केदारी, खामगावचे उपसरपंच राजू डुंबरे आदी उपस्थित होते.

तालुक्‍यात ज्या गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष असलेली 21 गावे आणि 135 वाड्यांमध्ये 18 टॅंकर सुरू असून जनावरांसाठी 3 टॅंकर कार्यरत असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली. हडसर, वडगाव आनंद, खिलारवाडी या गावांचे प्रस्ताव लवकरच मंजूर होणार असून सोमतवाडी, येणेरे, सोनावळे, बारव, पारगाव तर्फे मढ, बांगरवाडी आणि पेमदरा या गावांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आल्याचेही त्यांनी सांगितले. टंचाई आराखड्यात घाटघर, घोगरेवाडी, तांबे व कुसुर या गावांचा समावेश नसल्याने याबाबत प्रशासकीय परवानगी घेऊन जलद गतीने कामकाज सुरू असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. पाणी वाटपाचे सर्वस्वी अधिकार कालवा सल्लागार समितीकडे असून आवर्तन सोडताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक धरणावर येऊन आंदोलने करत आहेत, असा आरोप सोनवणे यांनी विरोधकांवर केला.

कुकडी प्रकल्पातील डिंभे धरणाची क्षमता कमी असल्यामुळे पावसाळ्यात हे धरण पूर्ण भरते आणि अतिरिक्त पाणी सोडून द्यावे लागते. हे अतिरिक्त पाणी माणिकडोह, येडगाव येथे आणण्यासाठी बोगद्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून सुमारे 250 कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती सोनवणे यांनी याप्रसंगी दिली. याकरिता जल संधारण मंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच धरण क्षेत्रात बुडीत बंधारे व विविध ठिकाणचे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची कामे शासन स्तरावर विचाराधीन असल्याचे ते म्हणाले. यापुढील काळात आदिवासी भागांमध्ये बुडीत बंधाऱ्यांची कामे अग्रक्रमाने सुरू करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले क्षेत्र सिंचनाखाली आणून सात नंबरचा अर्ज भरून पाणी मागणी वाढवावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने याप्रसंगी केले.

  • कुकडी प्रकल्पातील सर्वच धरणांची पातळी अत्यल्प झाली असून, या ठिकाणाचा गाळ शेतकरी विनामूल्य वापरू शकतात. याकरिता पाटबंधारे विभागाकडे अर्ज केल्यावर महसूल विभाग तातडीने परवानगी देणार आहे. मात्र या धरणांतून मुरूम किंवा वाळू काढण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल.
    – सचिन मुंढे, तहसीलदार
  • तालुक्‍यातील आने पठारावर यंदा प्रथमच चारा छावणी सुरू केली असून, 351 जनावरे येथे दाखल झालेली आहेत. कुकडी प्रकल्पात आजमितीस 251 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून यापुढे कुठलेही आवर्तन सोडण्यात येणार नाही.
    – के. आर. कानडे, कार्यकारी अभियंता
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)