जुन्नर तालुक्‍याचा दुष्काळग्रस्त तालुक्‍यांच्या यादीत समावेश करा

नारायणगाव- आदिवासी पट्ट्यातील 65 गावांचा गावनिहाय दुष्काळग्रस्त परिस्थितीचा पाहणी, अहवाल, आढावा आकडेवारीसह पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे देऊन जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त तालुक्‍यांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे युवा नेते अतुल बेनके यांनी दिली.
पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची सोमवारी (दि. 29) भेट घेऊन जुन्नर तालुक्‍यातील पावसाअभावी असणारी दुष्काळी परिस्थिती सांगून अहवाल सादर केला. यावेळी जुन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार, कार्याध्यक्ष तुषार थोरात, माजी पंचायत समिती सदस्य गणपत कवडे, गोविंद साबळे, अंकुश आमले, अमित बेनके, वरूण भुजबळ आणि इतर सहकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने यावर्षी दुष्काळग्रस्त तालुके जाहीर केले. यामध्ये जुन्नर तालुक्‍याचे नाव नाही. जून, जुलै महिन्यात सुरुवातीला पाऊस झाला. त्या दरम्यान खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. आदिवासी भागात भात हे प्रमुख पीक आहे. हे पीक परिपक्व होण्याआधीच पाण्याअभावी जळून गेले. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने भूजल पातळी खाली गेली आहे. विहिरी, बारव यांची पातळी खालावली आहे, त्यामुळे तालुक्‍यातील नगदी पिके धोक्‍यात आली आहेत. परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी हंगामही होणार नाही. त्यामुळे जुन्नर तालुक्‍यातील दुष्काळग्रस्त आदिवासी भागातील भात पिकासाठी नुकसान भरपाई मिळावी, धरणसाठा हा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आणि पिण्याच्या पाण्याच्या पूर्ततेसाठी राखीव ठेवावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची पीक कर्ज, सोसायटी कर्ज, वीज बिल माफ करण्यात यावीत, या भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी माफी, असे महत्त्वाचे मुद्दे सादर करून जुन्नर तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

  • लवकरच शासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील. जुन्नर तालुक्‍याचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्‍यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करून, आदिवासी भागातील भाताच्या पिकांची नुकसानभरपाई देण्यासाठी पाहणी दौरा करून भातासह सोयाबीन, ज्वारी, बाजरी इत्यादी पिकांचे दुष्काळामुळे नुकसान झालेल्या पिकांमध्ये समावेश करून त्या पिकांचीही नुकसान भरपाई मिळविण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. याबरोबरच मावळ भागात मंडलस्तरीय दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळग्रस्त भागासाठी तातडीने पाण्याचे टॅंकर चालू करणार करण्याच्या प्रयत्न करणार आहे.
    -नवल किशोर राम, जिल्हाधिकारी

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)