जुन्नर ठरला राज्यातील पहिला पर्यटन तालुका

  • विकासाला मिळणार गती ः पर्यटन आराखड्यातून जुन्नरची ओळख जगाला होणार

पुणे – राज्यातील पहिला पर्यटन तालुका म्हणून पुणे जिल्ह्यातील जुन्नरला हा बहुमान मिळाला आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्र्यांनी 19 फेब्रुवारीला अर्थात शिवजयंतीलाच केली असली तरी अधिकृत शासन निर्णय बुधवारी (दि. 21) प्रसिद्ध झाला आहे. यामुळे जुन्नर तालुक्‍याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे.
पर्यटन विकासासाठी आवश्‍यक असणारे बहुविविध नैसर्गिक सौंदर्य, तसेच चाली-रीती, रूढी-परंपरा, कला-संस्कृती, त्याचप्रमाणे ऐतिहासिक, नैसर्गिक, पारंपरिक वारसा लाभलेला जुन्नर हा पर्यटन क्षेत्र तालुका म्हणून घोषित करण्यासाठी स्थानिक आमदार शरद सोनवणे यांच्यामार्फत शासनाकडे, मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. याबाबत आज शासन निर्णय झाल्याने तमाम जुन्नरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. निर्णयात म्हटले आहे की, जुन्नर तालुक्‍यात पर्यटनदृष्ट्या अनेक वैशिष्ट्ये आढळून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ल्यासह सौंदर्याने नटलेले सात किल्ले, सर्वाधिक 350 लेण्या असलेला जुुन्नर हा एकमेव तालुका आहे. अष्टविनायकांपैकी गिरीजात्मक -लेण्याद्री व विघ्नेश्वर – ओझर ही मंदिरे, हेमाडपंथी बांधणीतील कोरीव तीन पुरातन मंदिरे, तीन समाधी मंदिरे तसेच इतर महत्त्वाची मंदिरे आहेत. माळशेज घाटाचा काही भाग, नाणेघाट-घाटघर, दाऱ्याघाट, अणेघाट- अणे असे निसर्गरम्य घाट व प्रसिद्ध धबधबे, नद्यांची उगमस्थाने तसेच जागतिक महादुर्बिण, आर्वी येथील दळणवळण उपग्रह – विक्रम, विविध पठारे, गिर्यारोहकांना आव्हान देणारे दोन ते तीन हजार फूट खोल असलेले कोकणकडे, माणिकडोह गावातील कुकडी नदी, बिबट्या निवारण केंद्र, पुरातन काळात भूकंप झालेल्या उद्रेकाची राख, कृषी पर्यटन केंद्रे, नारायणगाव हे तमाशा पंढरी असलेले गाव, आशियातील सर्वांत पहिली वायनरी, खाद्य संस्कृती, नैसर्गिक पूल, प्राचीन परंपरा असलेले आठवडे बाजार आहेत. हे नैसर्गिकरीत्या लाभलेले वैभव तसेच विविध वैशिष्ट्ये विचारात घेऊन जुन्नर तालुक्‍याला विशेष पर्यटनक्षेत्र म्हणून शासन निर्णय घोषित करण्यात आला आहे. या पर्यटन क्षेत्र विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही पर्यटन संचालनालय / पर्यटन विभागामार्फत करण्यात येईल.

  • पर्यटनदृष्ट्या जुन्नर देशात अव्वल
    सन 2012 मध्ये केंद्र सरकारने देशातील 10 ग्रामीण भागांची पर्यटनासाठी अनेक ठिकाणांहून माहिती मागवून घेतली होती. या अनुषंगाने जुन्नर तालुक्‍याची माहिती हचिको टुरिझम राजुरी या संस्थेचे मनोज हाडवळे यांच्यामार्फत दिली होती. ही माहिती खूप वैचारिकरीत्या मांडण्याचा प्रयत्न केला गेला. किंबहुना त्यामुळेच 10 ग्रामीण भागांतून जुन्नर तालुक्‍याने पहिला क्रमांक पटकावला. त्याच दिवशी जुन्नर तालुक्‍याचे नाव देशाच्या पर्यटन नकाशावर गेले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)