जुन्नर- जुन्नर नगरपरिषदेकडून मौजे आगर येथे असलेल्या कचरा व्यवस्थापन केंद्रावर ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जात असून, आतापर्यंत सुमारे 80 मेट्रिक टन खताची विक्री झाल्याचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता चळवळीची घोषणा केल्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण-शहरी’ या देशव्यापी स्वच्छता स्पर्धेचे आयोजन शासनाच्या वतीने केले जाते. शहरा-शहरांमध्ये निकोप स्पर्धा घेऊन अत्यंत कमी कालावधीत शाश्वत उपाययोजना करणे व स्वच्छतेच्या कामी लोकसहभाग वाढविणे हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट आहे. जुन्नर शहराने स्वच्छ सर्वेक्षण 2018 पासून या स्पर्धेत भाग घेतला आहे. घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्त शहरे, सांडपाणी व मैला व्यवस्थापन, लोक सहभाग, लोकांचा अभिप्राय, प्रत्यक्ष पाहणी आणि अभिनव संकल्पना अशा निकषांमधून शहरांची तपासणी केली जाते. स्वच्छता ऍपच्या माध्यमातून अनेक नागरिक या मोहिमेत सहभाग घेत आहेत. स्वच्छ सर्वेक्षण-2019 मध्ये स्टार रेटिंग हा एक निकष नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. शहरांचे 1 ते 7 स्टार गार्बेज फ्री सिटी असे मानांकन करण्यात येणार असून, या स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी सर्व नगरसेवक आणि अधिकारी यांनी सक्रीय सहभाग घेतल्याचे मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी सांगितले.
- सुमारे 2.15 कोटी रुपयांचा घनकचरा व्यवस्थापनचा डीपीआर सरकारने मंजूर केला असून, जुन्नर शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि देखभाल केली जात आहे. शहरातील निवासी क्षेत्रांत दिवसातून एकदा आणि व्यापारी क्षेत्रांत दिवसातून दोनदा सफाई केली जात असून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आरोग्य विभाग तत्पर आहे. जुन्नर शहर हागणदारी मुक्त शहर असून स्वच्छ, सुंदर व दिव्यांग फ्रेंडली सार्वजनिक शौचालये व 90 टक्क्यांपेक्षा जास्त वैयक्तिक घरगुती शौचालये जुन्नर शहरात आहेत. त्यामुळे जुन्नर शहर “ओडीएफ प्लस’चा दर्जा मिळण्यास पात्र आहे. नागरिकांनी ओला व सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण करून घंटागाडीमध्ये देणे बंधनकारक असून नागरिकांचा या योजनेस सकारात्मक प्रतिसाद आहे. सध्या सुक्या कचऱ्यामधून प्लॅस्टिक वेगळे करून ते रिसायकलिंग पाठविले जाते तर काही वस्तू या भंगार विक्रेत्यांना विकून नगरपरिषदेस उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे.
– प्रशांत खत्री, आरोग्य प्रमुख, जुन्नर - कचरा डेपोचे होणार बागेत रूपांतरण
सध्या अस्तित्वात असलेल्या आगर येथील कचरा डेपोवर असलेल्या 40 वर्ष जुन्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने (बायोमायनिंग) प्रक्रिया सुरू होणार आहे व त्यातून खतनिर्मिती केल्यावर उरलेला निरुपयोगी कचरा सुरक्षितरीत्या जमिनीत गाडला जाणार आहे. संपूर्ण कचरा डेपोचे सुशोभीकरण व वृक्षरोपण करण्यात आले, असून कचरा डेपोचे बागेमध्ये रूपांतरण झाले आहे. ओला (कुजणारा) कचऱ्यापासून घराच्या-घरीच सेंद्रिय खत निर्मिती करण्यासाठी नगरपरिषद सर्व नागरिकांना खताचे विरजण म्हणजेच बायोकल्चर देऊन खतनिर्मितीला प्रोत्साहित करत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा