जुन्नरमध्ये बदलणार राजकीय समीकरणे?

संजय थोरवे
निवृत्तीनगर-येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जुन्नर तालुक्‍यातून चार तगडे उमेदवार उभे राहण्याची शक्‍यता वर्तवली जात असून या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या घटण्याची शक्‍यता आहे. या चार उमेदवारांमध्ये आमदार शरद सोनवणे, शिवसेना गट नेत्या आशा बुचके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके तर कॉंग्रेसमधून युवा नेते सत्यशील शेरकर यांचा समावेश असणार आहे. मात्र, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस युती झाल्यास तसेच आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास राजकीय समीकरणे बदलण्याची शक्‍यता आहेत.
स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आमदार शरद सोनवणे यांनी मोफत सामुदायिक विवाह, गरीब होतकरू मुलांना मदत केली. तसेच प्रत्येक व्यक्‍तीच्या सुख दुःखात सहभागी होऊन “आपला माणूस’ म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हृदयात घर केले. यामुळे जनतेने त्यांना आमदारकीच्या खुर्चीत बसवले. मागील चार वर्षात अनेक समाज हिताची कामे त्यांनी केली. नुकतीच जुन्नर तालुक्‍याला महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून नावलौकिक मिळवून दिला. परंतु तालुक्‍यातील रस्त्यांचा प्रश्‍न, पुणे नाशिक महामार्गाचे रखडलेले काम त्यातून द्यावा लागणारा टोल हे प्रश्‍न अधोरेखीत राहिले. त्यामुळे जनता त्यांना येणाऱ्या विधानसभेत काय कौल देणार याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.
शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांची करारी नेतृत्व, तळागाळातील लोकांची कामे करणारी व्यक्‍ती अशी ओळख आहे. सरकारी अधिकारी वर्गाला फैलावर घेऊन गरीबांना न्याय मिळवून देतात. त्यामुळे त्या नेहमी चर्चेत असतात. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेली अनेक वर्षे तालुक्‍यातील जनतेची सेवा केली आहे. तीनवेळा आमदारकीला उभ्या राहिल्या. सन 2009- 2014 निवडणुकीत थोड्या मतावरून विजय निसटला. कधी मतांची फोडाफोड तर कधी पक्षांर्गत झालेली धोकेबाजी त्यांच्या अपयशाला कारणीभूत ठरली. येणाऱ्या निवडणुकीच्या उंबरठ्यावर विद्यमान आमदार शरद सोनवणे शिवसेनेत प्रवेश करून आमदारकी लढवणार असल्याची दबक्‍या आवाजात चर्चा आहे. जर असे झालेच तर शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी त्यांना स्वीकारतील का? त्यांना मदत करतील का? यावेळी आशा बुचके यांची काय भूमिका असेल, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे येणारा काळ देणार आहे.
शासन दरबारी जबरदस्त पगडा असणारे वल्लभ बेनके यांचे सुपुत्र अतुल बेनके यांनी 2014 -2019 विधानसभा निवडणुकीत निवडणुकीच्या रिंगणात आमदारकीसाठी ते उतरले होते. वडील वल्लभ बेनके यांच्या कामांचा नक्‍कीच उपयोग होईल, हे ध्यानी धरून त्यांनी ही निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आपल्याला जनतेने का नाकारले? याचे उत्तर त्यांनी शोधले. त्यांचा जनसंपर्क कमी पडला ही बाब त्यांच्या ध्यानी आली. त्यामुळे त्यांनी गेल्या चार वर्षांपासून जबरदस्त जनसंपर्क वाढवला असून तालुक्‍याचा पश्‍चिम पट्टा पिंजून काढला आहे. सोशल मीडियावर पुढचा आमदार अतुल बेनकेच म्हणून फोटो झळकत आहेत. या कार्यात त्यांचे बंधू अमित बेनके, सुरज वाजगे व सर्व कार्यकर्ते आत्तापासूनच जोमात कामाला लागले आहेत. नुकतीच अतुल बेनके यांनी मुंबई घाटकोपर या ठिकाणी भेट दिली असता तालुक्‍यातील मतदार जनतेने त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यामुळे आमदारकीच्या रेसमध्ये ते भारी पडण्याची शक्‍यता आहे.
जुन्नर तालुक्‍यात कॉंग्रेस घराणे म्हणून “शेरकर’ कुटुंब ओळखले जाते. माजी खासदार निवृत्ती शेरकरपासून ही परंपरा चालत आली असून त्यांचे बंधू स्व. सोपान शेरकर यांनीही ही परंपरा जपली होती. आता तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर ओळखले जातात. त्यांनीही कॉंग्रेसची परंपरा जपली आहे. सोपान शेरकर यांच्या निधनानंतर विघ्नहर कारखान्याच्या सर्व संचालक मंडळांनी अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर सोपवली. अगदी कमी वयात ही धुरा सांभाळण्यात त्यांना यश आले. मागील दिवसात कारखान्याची निवडणूक सर्वांना एकत्र करून बिनविरोध पार पाडून स्वतःमधील चुणूक दाखवून दिली. सर्वांची नाराजी दूर करणे, सर्वांना एकत्र धरून चालण्यात प्रगती आहे हे ओळखून त्यांनी सर्वांच्या मनावर राज्य केले आहे. मागील दिवसात झालेल्या जुन्नर पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा एक उमेदवार निवडून आणण्यात त्यांना यश आले. एक उमेदवार निवडून आणला मात्र, उपसभापती पद त्यांच्याच उमेदवाराला त्यांनी मिळवून दिले. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा झाला. यावेळी तालुक्‍यातील मोठ्या संख्येने युवकवर्ग त्यांच्याकडे येताना दिसला. त्याच्यावरून तालुक्‍यातील मोठी तरुण फळी त्यांच्या मागे उभी असलेली दिसते. तर ज्येष्ठ नागरिक जो कारखाना चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो तो तालुका का नाही सांभाळणार, असे मत व्यक्‍त करीत आहेत. त्यामुळे येणाऱ्या आमदारकीच्या रेसमध्ये सत्यशील शेरकर हे जादू करण्याची शक्‍यता आहे.
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यामध्ये युती झाली आणि तालुक्‍यातून कॉंग्रेसला तिकीट मिळाले तर राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते शेरकर यांना सहकार्य करतील का? याउलट राष्ट्रवादीला तिकीट मिळाले तर शेरकर मदत करतील का? असे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. तर गेली अनेक वर्षे पक्षाचे काम केलेले पदाधिकारी यावेळी पक्षाकडे तिकीट मागण्याच्या विचारात आहेत. यांची काय भूमिका असेल हे येणाऱ्या दिवसात समजणार आहे.

  • मला सध्या शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप सारख्या पक्षाचे प्रस्ताव येत आहेत. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहून योग्य ते निर्णय घेऊ.
    – शरद सोनवणे, आमदार, जुन्नर

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)